युवक जखमी : पाच जणांवर गुन्हे दाखल
नाशिक मिरर वेबटीम : घरातील लहान मुले फटाक्यांच्या आवाजाने घाबरतात, म्हणून फटाके लांब फोडा, असे सांगितल्याचा राग आल्याने पाच जणांच्या टोळक्याने तक्रारदाराच्या घरावर दगडफेक करत दंगल घडवून आणल्याची घटना पेठरोड परिसरात घडली. यात एका युवकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण आणि तलवारीने वार करण्यात आल्याने यात हा युवक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पाच संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. पेठरोडवरील शनि मंदिर गवळी वाडा येथे राहणाऱ्या राजू गवळी यांनी पंचवटी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, दिवाळीच्या सायंकाळी गवळी यांच्या घराशेजारी संशयित हल्लेखोर फटाके वाजवत होते. त्यावेळी गवळी यांचा पुतण्या प्रमोद संतोष गवळी यांनी घरी लहान मुले आहेत, ते घाबरतात, त्यामुळे फटाके लांब फोडा, असे सांगितले. याचा संशयितांना राग आल्याने त्यांनी गैरकायदा मंडळी जमवून प्रमोद गवळी याला शिवीगाळ व मारहाण करत हातातील रॉडने बेदम मारहाण केली. तसेच या संशयितांनी प्रमोदच्या नाकावर तलवारीने वर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच गवळी यांच्या घरावर विटा फेकून खिडकीच्या काचाही फोडल्या. यावेळी गवळी यांच्या घरातील काही मंडळी व स्थानिक नागरिक भांडण सोडविण्यास आले असता त्यांनाही संशयितांनी शस्रांचा धाक दाखवून मारण्याची धमकी देत परिसरात दहशत पसरवली. याप्रकरणी राजू गवळी (४०) यांच्या फिर्यादीनुसार ऋषिकेश मंजुळे, रोहिदास आहेर, कुणाल चौरे, संकेत चौरे, अमोल गायकवाड (रा. पेठरोड) या संशयितांवर जिवे मारण्याचा प्रयत्न व दंगल घडवून आणल्याचा आणि पोलीस आयुक्त यांच्या जमावबंदी-शस्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, सपोनि एम. एस. शिंदे व एस. जी. पवार यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास घटनास्थळी भेट दिली.
