दाढी-कटिंगच्या साहित्याचे दर वाढले परंतु दाढी-कटिंगचे दर ‘जैसे थे’च

सलून व्यावसायिकांना दुकान भाडे, वीजबिल, कॉस्मेटिकचे दर न परवडणारे 

व्यवसायावर परिणाम होईल म्हणून तूर्तास दरवाढ नाही!

 

नाशिक मिरर वृत्तसेवा :

नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून जवळपास राज्यातील सर्वच शहरांत दाढी व कटिंगच्या दरांत वाढ झाली आहे. मात्र नाशिकमध्ये कोणत्याही दरवाढीची घोषणा अथवा पत्रक नाभिक दुकानदार संघटनेने काढले नाही.

दरम्यान, ब्लेड, कात्री, क्रीम, फोम यांसोबतच वीज बिल, दुकान भाडे, कॉस्मेटिकचे दर वाढलेले असतानाही सलून व्यावसायिक आहे, त्याच दरात व्यवसाय करीत आहेत. शहरात सलून व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. साधारणपणे १ हजारपेक्षा अधिक दुकाने आहेत. मागील काही वर्षात बॅण्डेड कंपन्यांचे सलून शॉप्स शहरात व्यवसायाच्या निमित्ताने आले आहेत. पूर्वी सलून व्यवसाय फक्त नाभिक समाजातील लोकच करीत होते. मात्र आता सर्वच समाजांतील लोक एक चांगला व्यवसाय म्हणून साकारत आहे.

 

मटेरिअल अन् कॉस्मेटिकचे दर वाढले : 

महागाईच्या झळा सलून व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहेत. वाढत्या महागाईमुळे सौंदर्य प्रसाधनांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सलून व्यावसायिकांना लागणारी कात्री, ब्लेड, फोम, दाढी करण्यासाठी लागणारे क्रीम, पावडर यांसह अन्य साहित्य २० ते २५ टक्क्यांनी वाढले आहे. याशिवाय फेशियलच्या साहित्याचे दर वाढले आहेत.

 

स्टायलिश कटिंगसाठी वेगळे दर :

सध्या सिनेमातील हीरो ज्या पद्धतीने कटिंग किवा दाढी ठेवतो, त्याच पद्धतीने सेम टू सेम कटिंग अन् दाढी ठेवण्याकडे युवकांचा सर्वाधिक कल आहे. स्टायलिश कटिंग आणि दाढीसाठी जास्तीचा वेळ आणि मेहनत लागते. त्यामुळे स्टायलिश कटिंगसाठी वेगवेगळे दर असून, ते दुकानात पुरविण्यात येणाऱ्या सेवासुविधांवर अवलंबून आहेत. जास्तीचे दर असले तरी त्यासाठी पैसे मोजण्याची तरुणाईची तयारी आहे.

 

सध्याचे कटिंगचे दर :

कटिंग दाढी :१०० ते १२०

दाढी : ६० रुपये

मसाज : १५० ते २००

दाढी कट : ८० रुपये

फेशियल : ३५० रुपयांपासून पुढे

 

नाभिक महामंडळाच्या दरवाढीच्या सूचना आल्या परंतु त्यांनी शहरवासी ग्रामीण तसेच मध्य शहरवासी, यांना कोणत्याही प्रकारे विचारात न घेता, नाभिक महामंडळाचे नाशिक जिल्हाध्यक्ष यांनी सिन्नर तालुका ग्रामीण ची दरवाढीचे पत्रक सर्व ग्रुप वर टाकल्यामुळे शहरातील व्यवसाय करणारे नाभिक बांधव , एक प्रकारे दुखावले गेले आहेत. तसेच युनिक्स पार्लर यांचा सुद्धा, दरवाढीचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे.तरी सर्व शहरातील नाभिक समाजाच्या बांधवांना विनंती आहे, की आपण एकत्र येऊन बैठक घेतल्या शिवाय शहरातील दरवाढ करू नये. कोणत्याही समाजातील गटाने दरवाढीचा प्रस्ताव दिला तरी तो आपल्यापर्यंत योग्य आहे, किंवा नाही, याची शहा निशा केल्याशिवाय दरवाढ होणार नाही याची सर्व नाभिक समाजातील गटांनी नोंद घ्यावी.तुषार जगताप, अध्यक्ष नाभिक समाज बहुउद्देश्य संस्था, इंदिरानगर, पाथर्डी परिसर 

बातम्या

Don`t copy text!