बाजार भावात १ हजार ३५१ रुपयांची घसरण
लासलगाव :नाशिक मिरर वेबटीम : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऐन सणासुदीच्या तोंडावर कांदा बाजार भाव दोन दिवसात तब्बल १ हजार ३५१ रुपयांनी घसरल्याने शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.सोमवारी सरासरी ४ हजार ६५१ रुपये प्रति क्विंटलने विक्री झालेला कांदा आज दि ११ रोजी सरासरी ३३०० रुपये प्रति क्विंटलने विक्री झाला.शेतकऱ्यांना दोन दिवसात तब्बल १३५१ रुपये प्रति क्विंटलचा फटका बसला आहे.
गुरुवार १२ नोव्हेंबर पासून लासलगाव बाजार समितीला दिपावली निमित्त आठ दिवस सुट्या असल्याने बाजार समितीत कांदा आवक वाढलेली आहे.१२ सप्टेंबर नंतर प्रथमच येथील मुख्य बाजार आवारावर मंगळवारी बारा हजार क्विंटलचा पुढे कांदा लिलावासाठी आला होता.परदेशी आयात केलेला कांदा ,वाढती उन्हाळ कांदा तसेच नवीन लाल कांद्याची आवक यामुळे लासलगाव बाजार समितीत दोन दिवसात १३५१ रुपयाने कांदा गडगडल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. सणासुदीच्या काळात कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने कुटुंब कसे चालवावे आणि झालेला खर्च कसा काढावा असा प्रश्न आता कांदा उत्पादकांसमोर उभा राहिला आहे वेगवेगळ्या निर्बंधांमुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
