नाशिकमधील सीएनजी स्टेशनचे उदघाटन; बसही धावणार
घरोघरी सिलिंडरऐवजी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा
नाशिक मिरर वेबटीम: राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2020 च्या दिवशी नाशिकरांसाठी प्रदूषणाच्या दृष्टीने दोन खुशखबर वायुप्रदूषणमुक्त नाशिक करण्यासाठी महापालिकेला २० कोटींचे अनुदान मिळणार आहे .ज्या शहरांचे वायुप्रदूषण धोकादायक पातळीवर पोहचण्याची शक्यता आहे. अशा शहरांच्या वायुप्रदूषण मुक्तीसाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिले जात आहे. यामध्ये नाशिकचा देखील समावेश असून, तब्बल २० कोटी रुपये महापालिकेला देण्यात आले आहेत.केंद्र शासनाकडून २०१३-१४ या वर्षांमध्ये देशातील प्रमुख शहरांच्या वायुप्रदूषणाचे मापन करण्यात आले. त्यानुसार २ वर्षांपूर्वी १७ शहरांची यादी जाहीर करण्यात आली, यामध्ये नाशिकचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील हवेचा पडताळा घेतला जात असून, याअंतर्गत गेल्या वर्षी एक समिती बनवण्यात आली. या समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष स्थानी महापालिकेचे आयुक्त आहेत. तर नाशिक महापालिकेला हवा सुधार कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश शासनाकडून दिले गेले होते. त्यानुसार समितीने आराखडा सादर केला. आराखडा मान्य झाल्यांनतर आता शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तसेच वायुप्रदूषण मुक्त करण्यासाठी विविध उपाययोजनांकरिता २० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
नाशिकमधील सीएनजी स्टेशनचे उदघाटन; बसही धावणार
शहरातील पहिल्या सीएनजी (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) स्टेशनचे उदघाटन करण्यात आले आहे. केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या स्टेशनचे उदघाटन झाले आहे. त्यामुळे हे स्टेशन आता नाशिककरांच्या सेवेत आले आहे. परिणामी नाशिकला हरित इंधन प्राप्त झाले असून वायू प्रदूषण कमी करण्यात मोठी मदत होणार आहे.महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या राज्य सरकारच्या कंपनीतर्फे हे स्टेशन विकसित करण्यात आले आहे. नाशिक शहरातील हे पहिले सीएनजी स्टेशन आहे. नाशिक महापालिकेतर्फे लवकरच सुरू होणाऱ्या शहर बस वाहतूक सेवेत सीएनजी बसेस दाखल होणार आहेत. प्रधान यांनी एकूण ५ सीएनसी स्टेशनचे ऑनलाईनरित्या उदघाटन केले आहे. त्यात नाशिक मधील पाथर्डी फाटा येथे असलेल्या स्टेशनचाही समावेश आहे. एमएनजीएलचे आता एकूण १०० सीएनजी स्टेशन झाले आहेत. सीएनजी स्टेशनमुळे नाशिकमधील वायू प्रदूषण कमी होईल, असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला आहे. सीएनजी हे हरित इंधन म्हणून ओळखले जाते. देशभरात आता २५०० सीएनजी स्टेशन्स झाले आहेत. येत्या ५ ते ७ वर्षात १० हजार सीएनजी स्टेशन्स आणि ५ कोटी पीएनजी कनेक्शन्स देण्याचे आमचे उद्दीष्ट असल्याचे प्रधान यांनी सांगितले आहे.
घरोघरी सिलिंडरऐवजी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा
स्मार्ट शहराकडे वाटचाल होत असताना नाशिकमध्ये स्मार्ट प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यातीलच घरोघरी सिलिंडरऐवजी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्याची योजना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीतर्फे अमलात आणली जात आहे. नॅचरल गॅससाठी एमएनजीएल कंपनीने आडगाव ट्रक टर्मिनल, मालेगाव स्टॅन्ड, पाथर्डी फाटा, विल्होळी नाका या चार स्टेशनसाठी महापालिकेकडून पंधरा वर्षांसाठी जागेचा करार केला आहे. येथे सीएनजी युनिट, रिफलिंग केले जाईल. आता पुढील टप्प्यात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदावे लागणार आहेत. शहरात पहिल्या टप्प्यात दीडशे किलोमीटरची पाइपलाइन टाकली जाईल. परंतु रस्ते खोदण्यापूर्वी महापालिकेकडे डॅमेज चार्जेस भरावे लागणार असल्याने पुणे महापालिकेच्या धर्तीवर डॅमेज चार्जेसमध्ये सवलत मिळावी, अशी मागणी एमएनजीएल कंपनीकडून करण्यात आली होती. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पुणे व मुंबई महापालिकेइतकी सक्षम नसल्याने आयुक्त कैलास जाधव यांच्यासह स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी नकार दिला. त्यामुळे कंपनीने डॅमेज चार्जेस भरण्याची तयारी दाखविल्याने नॅचरल गॅस पाइपलाइन टाकण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
