नाशिक मिरर च्या पाठपुराव्याला अखेर यश ; नागरिक व बांधकाम व्यवसायिक यांना मिळाला न्याय
नाशिक मिरर वेबटीम : येथील गंगापूर शिवारातील धृवनगर परिसरात घरांचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोघांविरुद्ध अखेर दि.१२ रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, धृवनगरमध्ये स्वमालकीच्या प्लॉटवर घर बांधणाऱ्या नागरिकांसह व्यवसायिक सदनिका बांधणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून खंडणी वसूल करण्याचे काम सुरू होते. अशाच एका प्रकरणात स्वमालकीच्या प्लॉटवर बांधकाम करणाऱ्या सुदर्शन मधुकर ब्राह्मणकर यांच्या घराचे बांधकाम थांबवण्यात आले होते. तुम्हाला जर घराचे बांधकाम करायचे असेल तर तीन ते चार लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा मारहाण किंवा जे काही बांधकाम केले आहे, त्यावर जेसीबी चालवून सपाटीकरण करू, अशी धमकी व पैसे मागणी अरुण धोंडू पाटील व धनंजय उर्फ धना दांडेकर यांनी ब्राह्मणकर कुटुंबीयांकडे केली होती. ही जमीन आपली वडिलोपार्जित असल्याचे कारण सांगत अरुण पाटील व त्यांचे साथीदार लाखो रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार ब्राह्मणकर यांनी पोलीस आयुक्तांसह गंगापूर पोलिसांकडे केली होती. पैशाची मागणी करणारी ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. असे असतानाही गंगापूर पोलिसांकडून मात्र संबंधितांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा तक्रार आरोप ब्राह्मणकर कुटुंबीयांनी केला होता. विशेष म्हणजे या परिसरातील शेकडो बांधकाम व्यावसायिकांकडून पैसे उकळण्यात आले होते. मात्र तक्रार करण्यासाठी कुणीही पुढे येण्यास धजावत नव्हते. या प्रकरणावर नाशिक मिरर ने प्रकाशझोत टाकल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेतली. त्यानंतर गंगापूर पोलिस ठाण्यात भा.दं.वि कलम ३८४ /३४१/५०६/३४ नुसार खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा अधिक तपास गंगापूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल करीत आहेत.
