नाशिक मिरर वेबटीम : नाशिक मधील खुटवडनगर परिसरात सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास येथील रहिवासी वसाहती मध्ये गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात चार जण जखमी झाले. या स्फोटामुळे संपुर्ण घर उध्दवस्त झाले. हा स्फोट इतका भयानक होता की, घरापासून १० ते १५ फूट अंतरावर असलेल्या वाहनाच्या काचाही फुटल्या.
घटनेनंतर परिसरातील नागरकांनी घराबाहेर धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार लक्षात येताच नागरीकांनी बचाव कार्य सुरू केले. घटनेतील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेआहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोट एवढा भीषण होता की घराचे संपूर्ण नुकसान तर झालंच आहे, पण तडे जाऊन घराची भिंतही कोसळली आहे. तसंच घरापासून 10 ते 15 फूट अंतरावर उभ्या असणार्या वाहनांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले आहे. थंडीचे दिवस असल्याने दारे खिडक्या बंद असतात. त्यातच, गळतीमुळे गॅस सर्वत्र परसला आणि कोंडला गेला. त्यानंतर गॅस सुरु करताना किंवा इलेक्ट्रिकचे बटण चालू केल्याने हा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात. या घटनेनंतर घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी पाहणी केली. अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत.
