नाशिक मिरर :
गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू ,सुपारी आणि या सारख्या अन्नपदार्थ्यांदाच्या सेवनाने माणसाच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. या प्रतिकूल परिणामांमुळे तोंडाचा कर्करोग, इसोफॅगसचा, पॅन्क्रीयाजचा कर्करोख यासारखे गंभीर आजार होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगतिले आहे. त्यामुळे प्रतिबंध घातलेल्या तंबाखुजन्य पदार्थ्यांचे उत्पादन, साठा, वितरण आणि विक्री थांबवून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त चं.दौ.साळुंके यांनी एका शासकीय प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.
प्रसिध्दीपत्रकात नमूद केल्यानुसार, सर्व अन्न व्यावसायिकांनी कायद्यातील तरतूदींचे पालन करुन आपला व्यवसाय करावा व जनतेचे आरोग्य अबाधित ठेऊन स्वत:वरील कारवाई टाळावी. सर्व नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करतांना विशेष काळजी घेऊन परवानाधारक किंवा नोंदणीधारक अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करावे.तसेच खरेदी बिले घेणे, सदर अन्नपदार्थांचे लेबल, उत्पादन तारीख तपासून अन्नपदार्थांची खरेदी करावी. तसेच जनतेच्या आरोग्याचा विचार करुन प्रतिबंधीत अन्नपदार्थांचे व्यवसाय करणारे आढळून आल्यास 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर व 0253, 2351204 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करावे, असेही आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त चं.दौ.साळुंके यांनी प्रसिध्दी पत्रकाकान्वये केले आहे.
अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कायद्यानुसार अन्न व्यावसायिकांना अन्न परवाना, नोंदणी घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाविरुध्द कलम 63 अंतर्गत न्यायालयात खटले दाखल करण्याची तरतूद आहे. त्यामध्ये 6 महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच कोणत्याही असुरक्षित, अप्रमाणित, मिथ्याछाप व कायद्याचे उल्लंघन करणारे अन्नपदार्थाचे उत्पादन, वितरण, विक्री, साठा करणे हा या कायद्याने गुन्हा आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे नियमितपणे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात येतात. असुरक्षित अन्न पदार्थांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत न्यायालयात खटले दाखल करण्यात येतात. तसेच त्यात कमीत कमी सात वर्ष कारावास ते आजीवन कारावास व दहा लाख रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच कमी दर्जाचे अन्नपदार्थांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे, असेही श्री.सांळुके यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये सांगितले आहे.
