नाशिक मिरर वेबटीम : चांदशी शिवारातील हॉटेलमध्ये चालणारा बेकायदा हुक्का पार्लर अड्डा ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत हॉटेलमालक, व्यवस्थापकासह तीन वेटर आणि २३ ग्राहकांविरुद्ध कोटपा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.हॉटेल मालकासह २३ जणांवर कारवाई पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. चांदशी शिवारातील हॉटेल सेकमध्ये राजरोसपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (ता.५) रात्री अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकला असता, तेथे २३ ग्राहक तंबाखूजन्य पदार्थ सेवन करताना मिळून आले.संबंधितांना हॉटेल व्यवस्थापनाकडून हुक्का ओढण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थाचा पुरवठा केला जात होता.बेकायदा हुक्का पार्लरचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर याप्रकरणी हॉटेल मालक शिवराज नितीन वावरे, व्यवस्थापक सचिन सांगळे (रा. पंचवटी) यांच्यासह तीन वेटर आणि २३ ग्राहकांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून हुक्का ओढण्याचे साहित्य तसेच, तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात हस्तगत केला. या कारवाईने बेकायदा हुक्का पार्लरचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
