नाशिक येथील गंगापूररोड वरील घटना; सुदैवाने जीवित हानी नाही
नाशिक मिरर वेबटीम :
गंगापूररोडवरील केटीएचएम महाविद्यालयाजवळील मॅरेथॉन चौकात गुरुवारी (दि.२१)सकाळी नऊच्या सुमारास धावत्या दुचाकीवर (क्र.एमएच१५ सीबी ७७५७) अचानक भले मोठे झाड कोसळल्याची घटना घडली.
या घटनेत दुचाकी पूर्णपणे झाडाखाली दबली गेली आहे. दुचाकी झाडाखाली दबल्याचे हे भयावह चित्र पाहून दुचाकीस्वाराला मोठी दुखापत झाली असावी, असे वाटल्याशिवाय राहत नाही. मात्र दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखल्याने यात तो किरकोळ जखमी झाला, तसेच दुचाकीचे मोठे नुकसान आले आहे. दुचाकीस्वार हा अशोक स्तंभाकडून गंगापूर रोडच्या दिशेने जाताना मॅरेथॉन चौकात ही घटना घडली. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, हे झाड रस्त्यातून बाहेर काढले जात आहे. या झाडाखाली अडकलेली दुचाकी बाजूला काढण्याचे काम सूरु असून, नागरिकांच्या मदतीने दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
