साहित्य महामंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
नाशिक मिरर वेबटीम :
यंदाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 26, 27 व 28 मार्च रोजी नाशिकमध्ये होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत या तारखांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, या तारखा व संमेलनाध्यक्षांच्या नावाची अधिकृत घोषणा रविवारी सायंकाळी होणार आहे.साहित्य संमेलनासंदर्भातील साहित्य महामंडळाच्या बैठकांचे सत्र शनिवारी शहरात सुरू झाले. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष कपूर वासनिक, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, प्रदीप दाते, मिलिंद जोशी, उषा तांबे यांच्यासह आयोजक संस्था लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त हेमंत टकले, मुकुंद कुलकर्णी व प्रा. डॉ. शंकर बोर्हाडे यांच्यात बैठक झाली. तिच्या पहिल्या सत्रात संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या. प्रारंभीपासूनच संमेलनासाठी मार्चच्या अखेरच्या आठवड्यातील तारखा चर्चेत होत्या. मात्र, दि. 28 मार्च रोजी होळी येत असल्याने त्याबाबत पुन्हा विचारविनिमय झाला व अखेरीस याच तारखा निश्चित करण्यात आल्या.
या बैठकीत ग्रंथदिंडी, कविसंमेलन, संमेलनातील परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम या बाबींचा कच्चा आराखडाही निश्चित करण्यात आला. त्याला रविवारी होणार्या अध्यक्ष निवड व अन्य समित्यांच्या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. याबाबत रविवारी सायंकाळी अधिकृत घोषणा होणार आहे.
