नाशिक मिरर : नाशिक जिल्हा परिषद च्या आरोग्य विभाग अंतर्गत कंत्राटी पध्दतीवर काम करीत असलेले १०२ वाहनाचे वाहन चालक , कंत्राटी सफाई कामगार यांचे मागील ६ महिन्याचे थकीत वेतन किमान वेतनानुसार वेतन देण्यात यावी अशी मागणी प्राथमिक आरोग्य केंद्र कंत्राटी सफाई कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा परिषदचे आरोग्य अधिकारी व सीईओ यांच्याकडे निवेदन देऊन केली असून, वेतन न दिल्यास आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे.
सर्व कंत्राटी कामगार कोविड -१९ सारख्या महाभयानक परिस्थितीत देखील काम करीत आहे. परंतु गेल्या ६ महिन्यापासून कामगारांचे पगार झालेले नाही. त्यामुळे कामगार यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट झालेली असून घरात एक वेळचे जेवण सुद्धा तयार करणे जिकिरीचे झाले आहे.वेतन रोखले गेल्यामुळे दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तू घेण्याच्या ठिकाणी पहिलीच उधारी थकीत असल्यामुळे कोणीही किराणा सामान तसेच इतर दैनंदिन गरजेच्या लागणाऱ्या वस्तू आता उधारी स्वरूपात देत नाही. मुलांचे शैक्षणिक वर्ष ही त्यांच्या शाळेची फी न भरल्यामुळे वाया जात आहे,शाळा संचालक आम्ही आमच्या मुलांचे पैसे भरले नाही म्हणून त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी ही विरोध करत आहेत कोणाकडे मदत मागितली तर कोण उसणवारी पैसे देत नाही.
त्यात कोविड सेंटर मध्ये आम्ही काम करीत असल्यामुळे लोकही आमच्या जवळ येत नाही .
या संदर्भात सदर खात्याचे मंत्री यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कुठलीही कार्यवाही संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांवर करत नाहीत त्यामुळे १९ जानेवारी पासून सदर मागणीसह आरोग्य मंत्री , पालक मंत्री , कामगार आयुक्त यांच्याकडेही पत्र व्यवहार केला परंतू कोणीही दखल घेत नाही .त्यामुळे कामगारांची दयनीय परिस्थिती झाली आहे .कामगाराची उपासमारीची वेळ आली असून मानसिक संतुलन बिघडत आहे.
जर गेल्या ६ महिन्याचे पगार १४ एप्रिल पर्यंत न झाल्यास प्राथमिक आरोग्य विभागातील कंत्राटी कामगार , प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०२ चे वाहन चालक , हे दिनांक १५ एप्रिल पासून कामबंद आंदोलन करतील व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल आणि त्यानंतरही न्याय नाही मिळाला किंवा पगार न झाल्यास आम्हा सर्व कंत्राटी कामगारांना स्वयं इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशा मागणी चे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देताना संघटनेच्या अध्यक्ष शीला सुनील ठाकरे, कार्याध्यक्ष संजय सोमासे, कविता राजगुरू, कमल मिसाळ, सीमा ढिकले, संगीता बोडके, विक्रम मोंढे, बबलू जगताप ,शिवाजी फडोल, अनिल गुळवे ,रजाक शेख, विक्रम बाजारे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
कंत्राटी पध्दतीवर काम करीत असलेले १०२ वाहनाचे वाहन चालक , कंत्राटी सफाई कामगार यांचे मागील ६ महिन्याचे थकीत वेतन किमान वेतनानुसार वेतन देण्यात यावे.अन्यथा प्राथमिक आरोग्य केंद्र कंत्राटी सफाई कामगार संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेतील सर्व सदस्य सोबत छावा क्रांतिवीर सेनाचा जाहीर पाठिंबा असून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.
-करण गायकर, छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष
