सातपूर पोलिसांची कारवाई ; दोन चोरट्यांना अटक
नाशिक मिरर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील उज्वल भारत संचलित एमडी ट्रेडर्समध्ये गुरुवारी मध्यरात्री झालेल्या चोरीचा सातपूर पोलिसांनी दोन दिवसाच्या आत छडा लावत दोघा संशयितांच्या मुसक्या आवळन्यात यश मिळवले आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. गोटीराम श्रावण कोरडे (वय 32) व ओमकार दौलत किरकिरे (वय 18, दोघेही राहणार प्रबुद्ध नगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
सातपूर औद्योगिक वसाहतीतील उज्वल भारत संचलित एमडी ट्रेडर्स मध्ये गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यानी डल्ला मारत पाच लाख रुपयांच्या रोख रकमेसह तिजोरीच गायब केल्याची घटना घडली होती. शुक्रवारी सकाळी कंपनीचे संचालक दीपक आव्हाड यांच्या निदर्शनास ही घटना आली होती. आव्हाड यांनी सातपूर पोलिसांना पाचारण करत घटनेची माहिती दिली. सातपूर पोलिसांनी तपास चक्रे गतिमान करत शोध कार्य सुरु केले.
दरम्यान, रविवारी रात्रीच्या सुमारास आपल्या गुप्त बातमीदाराच्या माहितीनुसार सातपूर पोलीस व गुन्हे शोध पथकच्या सहकार्याने दोघा संशयित्यांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही सुरु आहे. सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पो. ह. संजय शिंदे, पो. ना. विनायक आव्हाड, गुन्हे शाखेचे मोतीलाल महाजन, बेंडकुळे, गोकुळ कासार, अंनत महाले आदींनी कामगिरी पार पडली.
मुद्देमाल व डिव्हिआरचा शोधा दरम्यान, संशयित आरोपींनी कंपनीतून चोरलेली रोख रक्कमेसह तिजोरी, सीसीटीव्ही कॅमेरेचे डिव्हीआर व हार्ड डिस्कचा शोध पोलीस घेत आहे. संशयितांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.-किशोर मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सातपूर
