नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संस्थेच्या आठवले-जोशी बालविकास मंदिर, मेरी या शाळेत कै. मनोहरपंत उपाख्य आप्पासाहेब भगवंतराव कुलकर्णी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुरुजी रुग्णालयाचे कार्यवाह प्रवीण बुरकुले उपस्थित होते.अध्यक्षस्थानी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व श्रीराम मेडिकलचे संचालक जयंत कुलकर्णी उपस्थित होते.
लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष उदय शेवलेकर, पदाधिकारी राजेंद्र सराफ, कै. आप्पासाहेब कुलकर्णी यांचे चरित्र लिहिणारे लेखक देशपांडे उपस्थित होते.
आंतरशालेय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत 103 शाळांमधून 385 विद्यार्थी शहरी भागात, तर 25 शाळांमधून 68 विद्यार्थी ग्रामीण भागात सहभागी होते. संस्थेतील शाळांमधून घेतल्या गेलेल्या विविध ऑनलाईन स्पर्धेत एकूण 168 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
आंतरशालेय स्पर्धेत तीनही गटात प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी भाषण केले. यात गट क्रमांक १ – मधील सोनाक्षी किरण सोनवणे (अरविंद मनोहर कुलकर्णी शाळा), गट क्रमांक २ मधील तनिष प्रकाश माले (लोकमान्य विद्यालय) आणि गट क्रमांक ३ मधील तनिष्का विलास सोनार (र. ज. चव्हाण गर्ल्स हायस्कूल) यांचा समावेश होता. प्रवीण बुरकुले यांनी उत्तम वक्ता होण्यासाठी पुस्तक वाचनाचे महत्व विशद केले. तसेच भाषणात आपल्या विषयाचा सर्व बाजूंनी विचार करून मुद्दे मांडण्याची आवश्यकता स्पष्ट केली. शालेय समिती अध्यक्ष जयंत गायधनी यांनी उत्तम वक्त्यांची लक्षणे सांगितली. पारितोषिक वितरणाची सूत्रे अर्पिता घारपुरे व शर्मिला डोंगरे यांनी सांभाळली.
शशांक इखणकर व शिक्षिका यांनी ईशस्तवन व स्वागतगीत म्हटले. तबल्यावर साथ विद्यार्थी हनुमान ढोणे याने केली. प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका भारती ठाकरे यांनी कै. आप्पासाहेब कुलकर्णी यांच्याविषयी माहिती सांगितली. मीनल कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सीमा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या फेसबुक लाईव्ह प्रक्षेपणाची जबाबदारी शिक्षक राजेंद्र बिराडे यांनी सांभाळली. अस्मिता अहिरे यांनी आभार मानले. शांतीमंत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला.
