नाशिक मिरर :
नाशिक महानगरपालिका हद्दी मधील शहरातील सर्व विभागामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीररित्या मोबाईल नेटवर्क टॉवर उभारले आहेत.काही ठिकाणी कामे सुरू आहेत.नाशिक मनपा च्या नगरनियोजन विभागाने नुकतेच मोबाईल टॉवरच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे.त्यानुसार शहरातील अनेक मिळकतधारकांना खाजगी मोबाईल कंपन्यानी आर्थिक लाभाचे अमिष दाखवून त्यांचे मिळकतीवर टॉवर उभारले आहे. मात्र या मिळकतधारकांना अल्प प्रमाणात भाडे देवून उर्वरीत रकमेबाबत टाळाटाळ केली जात आहे. तसेच अनेक मिळकतींवर मनपाची कुठलीही परवानगी न घेता परस्पर मोबाईल टॉवर बसवले जात आहे.
सध्या सातपूर परिसरात आनंदछाया परिसरात सुयोग टेलिमॅटीक्स या कंपनीमार्फत मनपाची कुठलीही परवानगी न घेता टॉवर बसवण्याचे काम चालू आहे. त्यामुळे मनपाचा देखील मोठ्या प्रमाणावर महसुल बुडत आहे.
तरी मनपा हद्दीत एकूण किती मोबाईल टॉवर आहेत. त्यापैकी किती अधिकृत व किती अनाधिकृत टॉवर आहेत. अनाधिकृत टॉवरवर मागील काही वर्षात मनपामार्फत काय कारवाई केली गेली आहे. तसेच मनपा हद्दीतील मिळकत धारकांची मोबाईल कंपन्या ज्या लूट करीत आहे त्यावर मनपा प्रशासनामार्फत काय कारवाई केली जाते याबाबतची सविस्तर माहिती लेखी स्वरुपात अवगत करुन द्यावी व शहरातील अनाधिकृत मोबाईल टॉवर तसेच या बसवणाऱ्या कंपन्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य सलीम शेख यांनी नगररचना विभाग प्रमुख व मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदन देवून केली आहे.
