साडी म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय! केवळ स्त्रियांचाच नाही तर पुरुषांचाही. कारण पुरुषांना स्त्रिया साडीत आवडतात असे म्हटले तर वावगे ठरू नये.
स्त्रीच्या मनात तर बालपणापासून साडी रुजलेली असते. कारण जन्माला येताच त्या आईच्या, आजीच्या मऊ सुती साड्यांच्या दुपट्यांवर विसावतात. पुढे जुन्या साड्यांची उबदार गोधडी असतेच सोबतीला. थोड्या मोठया झाल्या की खेळभांडे (भांडीकुंडी), टीचर-टीचर खेळताना ताईची, आईची ओढणी साडीसारखी नेसतात आणि घरभर मिरवतात. शाळेत असताना कधी शिक्षक दिनाला तर कधी दहावीच्या निरोप समारंभाला आणि महाविद्यालयात ‘साडी डे’ ला साडी नेसण्याची हौस पूर्ण होते. एकदा का लग्न ठरलं की मग साडी तिची कायमची सखी बनते आणि प्रत्येक पहिल्या सणाची, प्रसंगाची आठवण निर्माण करते. या आठवणी इतक्या गहिऱ्या असतात की साडी कितीही जुनी झाली तरी ती टाकवत नाही. साखरपुड्याची लाल चुटुक, लग्नात मामाकडची पिवळी अष्टपुतळी (अष्टपुत्री), लक्ष्मी पूजनाचा मोती कलर, डोहाळे जेवणाची हिरवीगार, तर पहिल्या संक्रांतीची काळी साडी सारख्या मनात रुंजी घालत असतात. त्यामुळेच हल्ली साडी जुनी झाली की त्याचा ड्रेस शिवून घालण्याची फॅशन आहे.
भारतीय पेहरवाची खूण
भारतीय पेहरवाची खूण आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी ही वैशिष्ट्यपूर्ण साडी पाश्चात्यांना देखील भुरळ घालू लागलीय. साडी म्हणजे काय तर स्त्रियांनी कमरेभोवती गुंडाळून नेसण्याचे विशिष्ट लांबी-रुंदीचे कापड. केवळ एक सलग कापड पण ते परिधान करण्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे स्त्रियांचं सौंदर्य अधिक खुलते.

साडीचे विविध प्रकार
कापडाचा पोत, त्यावर केलेली कलाकुसर, नेसण्याची पद्धत यांवरून साडीचे विविध प्रकार पडतात. भारतातील जवळपास सर्व राज्यात साडीची स्वतंत्र ओळख आहे. जसे की महाराष्ट्राची पैठणी, नऊवारी, जम्मू काश्मीरची काश्मिरी, पंजाबची फुलकारी, उत्तर प्रदेशची बनारसी, बंगालची बालुचरी, ओडिशाची संबलपुरी, बोमकायी, आंध्र प्रदेशची मंगलगिरी, तेलंगणाची पोचमपल्ली, कर्नाटकची मैसूर सिल्क, तामिळनाडूची कांजीवरम, केरळची कसावू, आसामची मुगा सिल्क, बिहारची भागलपूर, मध्यप्रदेशची चंदेरी, छत्तीसगडची कासा सिल्क, गुजरातची पटोला इत्यादी इत्यादी….केवढे ते प्रकार! तरीही रुग्णालयातील परिचारिका नेसतात ती निळे काठ असलेली पांढरी साडी, पोलिसांची खाकी साडी, होमगार्ड कर्मचारी किंवा सफाई कामगार नेसतात ती निळी (नेव्ही ब्लू), वकिलांची पांढरी साडी, अगदी एखाद्या सराफाच्या दुकानात एक सारख्या साड्या नेसलेल्या स्त्रिया बघितल्या की जाणवते साडी केवळ सौंदर्य खुलवत नाही तर त्यांच्या वरील कर्तव्य आणि जबाबदारी ही अधोरेखित करते.
हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली साडी तिचे अस्तित्व अजूनही टिकवून आहे. हे साडी प्रेम असेच अबाधित राहो कारण ती भारतीय स्त्रीची ओळख आहे.
