नाशिक मिरर विशेष :
कृषी शिक्षण क्षेत्रात महिलांचा सहभाग दिवसागणिक वाढत चाललाय. कृषी पदवीधर, पदव्युत्तर अगदी त्यात डॉक्टरेट सुद्धा मुली मिळवू लागल्या आहेत.
जागतिक महिला दिन विशेष : कष्टते ती, सोसते ती. तरीही..?
कृषी व्यवस्थापनात पदवी मिळवणाऱ्याही वाढतायत. सदर शिक्षण प्राप्त करून कृषी खात्यात, विद्यापीठात, संशोधन केंद्रात, कृषी विज्ञान केंद्रात विविध उच्च पदांवर त्या विराजमान आहेत. कृषी उद्योगात भरारी घेत स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्याही अनेक आहेत. समाजात त्यांना मान आहे आणि तो त्या कर्तुत्वाचा सन्मानच आहे. परंतु आज बोलणार आहोत ते कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या व महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या महिला शेतकरी व शेत मजूर यांचे विषयी. शेतीविषयक रीतसर शिक्षण घेतले नसले तरी त्या शेतीच्या उत्तम जाणकार असतात. अनुभवी असतात. देशी वाण संवर्धन करणाऱ्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त “राहीबाई सोमा पोपेरे” हे त्याचे उत्तम उदाहरण.

“महिला शेतकरी” हा उच्चार कानाला वेगळा वाटला ना? 2011 च्या जनगणनेनुसार देशातील 65 टक्के स्त्रिया शेतीमध्ये गुंतलेल्या आहेत. तरीदेखील शेतकरी म्हटले की आपल्या डोळ्यापुढे येते ती पुरुषी प्रतिमाच! आजही बहुतांश महिलांच्या नावावर सातबारा नसतो. त्यामुळे शासनाच्या शेती विषयक योजनांचा, प्रकल्पांचा त्यांना प्रत्यक्ष लाभ घेता येत नाही.
“आमचं हे शेती कर्त्यात नि मी त्यासनी मदत” असे म्हणणाऱ्या महिला खरेतर पुरुषांच्या बरोबरीने तर कधीकधी त्यांच्यापेक्षा जास्त आणि कुशलतेने काम करताना दिसतात. शेतजमीन तयार करण्यापासून ते माल विक्री करेपर्यंत प्रत्येक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. किंबहुना तण काढणे, खुरपणी, उकरणी, भाजीपाला लागवड, फुले फळे तोडणी, पिकांची कापणी, पॅकेजिंग, काढणी पश्चात व्यवस्थापन, माल साठवणूक, घरी पशुधन असेल तर त्यांचे गोठे साफ करणे, धार काढणे, चारा पाणी देणे अश्या सर्व कामात महिला राबतात आणि ते ही घरची सर्व कामे आटोपून, जबाबदाऱ्या पार पाडून, आल्यागेल्याचे करून. ही सगळी कामे अंगमेहनीतीची असल्यामुळे त्यांना पुरेशी विश्रांती, सकस आहार मिळणे जरुरीचे असते पण तसे होताना दिसत नाही. गरोदर स्त्रिया देखील नवव्या महिन्या पर्यंत शेतात काम करताना दिसतात. काम करणे चांगले आहे परंतु शरीरीक ताण पडणे योग्य नाही. त्याचा मानसिक स्वास्थावर देखील परिणाम होतो. वावरातून थकून भागून आल्यावर घरचे देखील “ती” बघेलच हे गृहीत धरलेले असते. शिवाय सध्या त्या वापरत असलेले शेती अवजारे, उपकरणे हे पुरुषांना नजरेपुढे ठेऊन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे स्त्रियांनी ते वापरताना त्यांना अधिक श्रम पडतात व अतिरिक्त ऊर्जा खर्च होते. भरीसभार म्हणजे त्या स्वतःच्या आरोग्याकडे कायम दुर्लक्ष करतात.
सतत राबणाऱ्या या माऊलींना शेती व त्यासंबंधी आर्थिक व्यवहारात, निर्णयात फारसे विचारात घेतले जात नाही हे किती निराशाजनक आहे! शेतीसाठी कर्ज घेतलेला आणि परतफेड करता आली नाही म्हणून हतबल झालेला शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्याची पत्नी धीर एकवटून घरदार सांभाळून शेती व्यवसाय समर्थपणे पेलताना दिसते यावरून तिच्यात संयम आहे, कौशल्य आहे, स्थैर्य आहे, उमेद आहे, जबाबदारीची जाणीव आहे हे सिद्ध होते.
घरी आलेली सुबत्ता आणि संपदा याचे श्रेय कायम ती आपल्या घरधन्याला देते. कधीतरी आपणही मनाचा मोठेपणा दाखवुया ना. त्यांना त्यांचा मान देऊया. त्यांचे मत विचारात घेऊया. राज्य शासनाच्या वतीने 2022 हे महिला शेतकरी सन्मान म्हणून साजरे केले जाणार असल्याचे नुकतेच वाचण्यात आले. हे स्तुत्यच आहे. तरीही सर्व कृषी तज्ञांना विषतः महिला कृषी तज्ञांना आवाहन करावेसे वाटते की शेतात राबणाऱ्या महिला शेतकरी व शेतमजूर यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर धोरणात्मक बदल करण्याचे दिशेने पाऊल उचलावे. या महिलांचे श्रम कसे कमी करता येईल, त्यांना त्यांच्या आरोग्या बाबत कसे जागरूक करता येईल, त्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन कसा वाढवता येईल आणि त्यांना अधिक सक्षम कसे करता येईल या दिशेने अधिकाधिक संशोधन व्हावे, प्रकल्प राबवावे.
