नाशिक मिरर विशेष लेख : 

आईची घुसमट आठवली की मन हळहळते. ज्या बाबांनी माझे हट्ट पुरवले तेच बाबा आईचे यजमान म्हणून कडक होते. त्यांच्या शिस्तीचा तिला धाक होता. मनलहरी स्वभावाचं दडपण होतं. घरात येणाऱ्या जाणाऱ्याचा राबता होता. कुटुंब मोठे होते. तिला खूप मर्यादा होत्या. जबादारी होती, बंधने होती. खुप कष्ट होते. तिला व्यवस्थित माहीत होतं तिच्या पंखामध्ये बळ आहे तरीही तिने उंच भरारी घेतली नाही. पूर्ण ताकदीने मुलांचे संगोपन मात्र केले. उत्तम संस्कार दिलेत. नेटाने संसार केला. पदरी पडले ते गोड मानले. आपल्या माणसात तिने आनंद शोधला. मला मात्र वाईट वाटते, तिला आपल्या सारखं मोकळं जगता आलं नाही याचं. आणि तिला वाटतं तिच्या पेक्षा फार घाईचा संसार आहे माझा, कसलीही उसंत नाही म्हणून तिला माझ्या साठी वाईट वाटतं.
मी तशी स्वतंत्र विचारांची. म्हणजे एखादा विषय चूक की बरोबर यावर मी माझे मत नोंदवते. मला एखादी गोष्ट नाही पटली तर निदान विरोध करते. चारचौघात मी बोलू शकते, मन मोकळ्या गप्पा मारू शकते. सहजीवनात बायको म्हणून मला आदराचे, मानाचे स्थान आहे. वागण्याच्या मर्यादा असल्या तरी व्यक्त होण्याची मोकळीक नक्कीच आहे. निर्णय घेताना माझं मत विचारात घेतलं जातं. मला शिकता आले, हट्ट करता आला आणि तो माझ्या पालकांकडून, नवऱ्या कडून पुरवल्याही गेला. हौस मौज झाली. आवडीने इतरांसाठी जसा मी स्वयंपाक केला तशी स्वतःची आवडही जपली. कुणी टोकले नाही. कामे सुकर होण्यासाठी मदतीला यंत्र आहेत. मोठ्यांचा मान म्हणून मी साडी नेसले पण आवडीचा, सोयीचा पेहराव देखील मला करता आला. सण समारंभात जबादारी पडली पण ती निभावताना कौतुक देखील झाले. आर्थिक स्वावलंबन मिळवता आलं, कुठे थांबायचं ठरवता आलं. समाधानानं, स्वच्छंदी आयुष्य मी जगत आहे.

माझ्या आयुष्यातील पुढचं पाऊल ‘माझी मुलगी’. छोटुश्या कुटुंबात लाडा कौतुकात वाढणारी. हट्ट पुरवून घेणारी. तिच्या बाबांच्या काळजाचा तुकडा जणू! तिची खूप स्वप्ने आहेत. ती पूर्ण करण्याची तिची धडपड मला जाणवते. नवीन गोष्टी शिकण्याची, आत्मसात करण्याची तिची तयारी आहे. तिच्यात स्पष्टपणा आहे. तिच्या आयुष्यात मोजकी माणसं आहेत आणि त्या सर्वांकडून तिला केवळ होकार ऐकण्याची अपेक्षा असते. नाही म्हणायला आभासी जगात ती रमते. मी मात्र तिच्यासाठी कमालीची बेचैन होते. तिचं बालपण देखील मला सुरक्षित वाटत नव्हतं आणि आतातर ती तारुण्याच्या उंबरठ्यावर आहे. आजूबाजूच्या असंख्य वाईट नजरा पहिल्या की मन धास्तावते. तिचा पेहराव, बिनधास्त राहणं, वागणं, बोलणं मला चिंताग्रस्त करतात. तिला वाटत राहतं आपली आई सुशिक्षित आहे तरी देखील संकुचित विचार करते पण कसे सांगू? मी, कमी शिकलेल्या माझ्या आईची मुलीच्या सुरक्षिततेसाठी तळमळ पहिली आहे, अपूर्ण स्वप्ने गेंजारताना पहिली आहे आणि खूप शिकलेल्या पुढच्या पिढीचं वाहवत जाणही पाहिलंय. म्हणून मी चिंतेत असते.
असे हे वास्तव मला सतत प्रश्न करणारे “जनीं सर्व सुखी असा कोण आहे”

बातम्या

Don`t copy text!