नाशिक मिरर विशेष : 

          पुन्हा एका आत्महत्येनं मन हेलावून गेलं. असे तर जगात रोज शेकडो लोकं आपले आयुष्य स्वतःहून संपवतात पण लौकिकार्थाने मोठ्या असलेल्या व्यक्ती जीवन संपवतात तेव्हा चर्चा होतात. उलटसुलट विचारांना उधाण येतं आणि थोड्या दिवसात सारं काही शमूनही जातं. पुन्हा कुणीतरी “मोठं” हा जीवन प्रवास स्वतःहून थांबवतो आणि परत एकदा त्याच चर्चा होऊ लागतात. तेच प्रश्न निर्माण होतात, का? असे का?…….

    यावर अनेकांचे अनेक मत पण नैराश्य हे प्रामुख्याने पुढे आलेलं कारण. आहे तरी काय? येतंय कुठून हे नैराश्य? याला हरवू शकतो आपण? यावर मी माझ्या परीनं घेतलेला हा वेध…..

वारंवार मनाविरुद्ध घडतं, सारखा नकार ऐकावा लागतो, स्वप्न दूर पळत राहतात, सारख्या हातून चुका होतात, कुणाशी बोलावे तर त्याला चर्चा करायची नसते फक्त त्याचं मत सांगायचं असतं तेव्हा होतो दुःखाचा जन्म. एखाद्या व्याधीने ग्रासलो असतो, आर्थिक परिस्थितीने गांजलो असतो तेव्हाही दुःखच जन्माला येतं. या दुःखाचा जेव्हा डोंगर होतो, मनाला वेदना असह्य होतात तेव्हा मग नैराश्य येतं आणि आपल्याला संपवू पहातो. “हे जग सुंदर आहे” हे मुळी एकायलाच येत नाही, दिसतही नाही, जाणवतही नाही. कारण आपण आपल्यातच गुरफटलेले असतो. “कुणी नाही आपलं” आपणच आपलं ठरवलेलं असतं.
आपण सहज म्हणतो कुणाशी तरी बोलावं, मनात सल ठेऊ नये, मन हलके करावे. अहो पण कुठे? ज्याच्याशी बोलावे त्याला ही सल कळतंच नाही. डोक्यातील एक खूळ म्हणून गप्प बसायला सांगतो. मन ओळखणे इतके सोपे का आहे? मन तर बहुरंगी असते. सतत बदलते आपल्या मूड प्रमाणे. प्रेमात असलो की गुलाबी दिसते म्हणे सगळं. मन तेव्हा गुलाबी असते का? असेलही. यशाच्या शिखरावर असताना हिरवळ दिसते चहूकडे. कारण हिरवळ म्हणजे समृद्धी. मन उदास, बेचैन असले की सगळीकडे पांढर दिसतं परंतु मन शांत, स्थिर असलं तरीसुध्दा पांढर स्वछच दिसतं चहूकडे. मन भक्तीने भारावलेल असलं की भगवा रंग असतो मनाचा. तो उसळत असतो नसानसांत. एखादा क्रोधात असला की कसा लालबुंद होतो त्याचा चेहरा. काळजीत, चिंतेत असला की काळवंडून जातो चेहरा. आणि आनंदी असला की चकाकी येते चेहऱ्यावर अगदी सोन्यासारखी. असे हे आपले बहुरंगी मन जपले पाहिजे आपण. आपले ही आणि इतरांचेही. कारण त्यांच्या मनाचे ही रंग असतातच की. त्या साठी आपले मन निळ्याशार आकाशा एवढे हवे. हो ना?

आपली काया हे बाह्यरुप, तनु किंवा शरीर…या कायेचा खरा सूत्रधार आपले मन. या मनाची जेवढी उत्तम मशागत आपण करू तेवढी ही काया बहरते. प्रसन्न, उल्हासित, समाधानी मनाची काया नेहमीच चकाकते. मग त्यासाठी कुढल्या वेगळ्या सौंदर्य प्रसाधनांची गरजच नाही. तेच दुःखी, असमाधानी, लोभी मनाची काया निस्तेज दिसते. आपले नेमके मना कडेच दुर्लक्ष होते आणि आपण काया सावरण्यात मग्न होतो, मनाचा पसारा तसाच अस्ताव्यस्त ठेवतो.
“दूर असू द्या मोह माया
जैसे मन तैसी काया”

पण आपलेच मन आपल्याला पारखे असते कधी कधी तिथे दुसऱ्याचे कसे जाणून घेणार? मग करायचे काय? असेच एकेकाचे संपणे बघत राहायचे? मला वाटते इथे ‘precaution is better than cure’ हे पाळावे. नैराश्य येऊच नये म्हणून काळजी घ्यावी. त्यासाठी कुणाशीही स्पर्धा न करता आपले स्वप्न, इच्छा, आकांक्षा पूर्ती साठी सतत प्रयत्नशील राहावे. पुढे पुढे जाण्याची हिंमत ठेवावी. अपयश पचवण्याची ताकद वाढवावी. नकार ऐकण्याची कुवत असावी. आपलं कुणी ऐकलं नसलं तरी दुसऱ्याचं ऐकण्याची तयारी ठेवावी *कारण दुसऱ्याच्या दुःखात खूपदा आपल्या प्रश्नांची उत्तरे असतात.* नात्यांची मर्यादा, बंधने पाळताना अनोळखी व्हावे कधी कधी म्हणजे तटस्थपणे स्वीकारता येतं, बोलता येतं.

आपल्या मनाला केवळ आपणच सुदृढ ठेऊ शकतो. सकारात्मक विचारांनी पोषण करू शकतो. नैराश्याला हरवू शकतो, आपणच. म्हणूनच म्हणावेसे वाटते….
“या जगी आनंद शोधेल मी
पाऊल आशेचे टाकेल मी
मनाशी संवाद साधेल मी
नव्याने एकदा जगेल मी”👍

बातम्या

Don`t copy text!