नाशिक मिरर विशेष :

     मिट्ट काळोख दूर सारून रंगांची उधळण करीत सूर्यदेव रोज येतो आणि सोनेरी किरणांनी धराला न्हाहू घालतो. निळ्या सावळ्या आसमंती देखील रंगाच्या कैक छटा उमटतात. हा रंगीत नजरा बघण्यासाठी मात्र आपल्याला डोळे उघडावे लागतात. आळस झटकून डोळसपणे जर का निसर्ग न्याहाळला तर तो कमालीचा सुंदर दिसतो. प्रत्येक ऋतूत, प्रत्येक प्रहरी याचे रंग वेगळे आणि तितकेच लाजवाब! म्हणूनच कदाचित अनेक साहित्यात, चित्रात, छायाचित्रात, रांगोळीत, चित्रपटात हा निसर्ग सुरेख रीतीने गोवल्या गेला आहे. अनेकांच्या जगण्याची तो प्रेरणा आहे. एवढेच कशाला रंग हे मानवी भावनांचे प्रतीक देखील आहे. उदा. गुलाबी रंग प्रेमाचा, भगवा रंग शौर्याचा, हिरवा समृद्धीचा, पांढरा शांततेचा इत्यादी.
मला ना लहानपणी ही कविता फार आवडायची. अजूनही आवडते…
फुलपाखरा ये इकडे,
छान गडे तू छान गडे

सुंदर सुंदर रंगांनी
रंगविले तुजला कोणी….

ही कविता शिकल्या पासून क्षणभंगुर आयुष्य असलेल्या विविधरंगी फुलपाखरांच्या मी प्रेमात पडले. किती सुंदर रंगांचे असतात हे इवले जीव! काळा, पांढरा, जांभळा….मला वाटते निसर्गात असलेल्या सर्व रंगामध्ये ही फुलपाखरं असतात. बरं ही फुलपाखरं ज्यावर बागडतात ती फुलं देखील किती मोहक! अगदी रानात विपुल वाढणारी घाणेरीच बघाना, छोटसं गुच्छेदार फुल. पण लाल, पिवळा, गुलाबी असे मिश्रण असलेलं. एवढेच कशाला गंधहीन अबोली नुसत्या रंगानेच तर आकर्षित करते. काही फुलं ही शेडिंग मधे असतात. म्हणजे पाकळीचा थोडा भाग वेगळ्या रंगाचा आणि थोडा वेगळ्या. किंवा मध्ये हलका रंग आणि बाकीचा गर्द. जसे की गोकर्ण किंवा कृष्ण कमळ. कमाल आहे नाही. हिरव्या पर्णाच्या झाडाला रंगीत फुले लागतात! या पानात देखील केवढी वैविध्यता! फांदीवर नुकतंच जन्मत तेव्हा ते कोवळं लुसलुशीत फिकट गुलाबी, कथ्या रंगाचं दिसतं, नंतर पोपटी मग हिरवं आणि पिकलं की पिवळसर आणि गळून खाली पडलं की भुरक्या रंगाचे निस्तेज दिसणारे. या हिरव्या रंगाच्या ही अनेक छटा. क्रोटॉन हा आणखी अनोखा प्रकार. या झाडांना फुलं येत नाही पण तीच मुळात इतकी देखणी असतात की अनेकांच्या दिवाणखाण्यात त्यांना मानाचं स्थान आहे.
या झाडा वेलींवर विसावणाऱ्या, घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांचं निरीक्षण केलंय कधी?
सकाळी किलबिलाट करत जाणारे आणि चिवचिवाट करत परत येणारे पक्षी दुरून काळे दिसतात पण त्यांना जवळून कॅमेऱ्याने न्याहाळण्याचा कधी योग आला तर कळतं दिसतं तसं नसतं.

       ते कल्पने पलीकडे सुंदर असतात. हिरवागार पोपट, निळा खंड्या, पिवळा हळद्या, पांढरा बगळा, करडी चिमणी किंवा आपला थुई थुई नाचणारा मोर ही त्याचीच साक्ष देतात. कीटक, प्राणी यांचेही रंग भिन्न असतात. सरडा तर बहुरंगी!

ज्या मातीत आपली मुळं घट्ट रोवून ही झाडे उभी असतात त्या मातीला ही रंग असतो. जसे की काळीशार, तांबडी, पिवळी तपकिरी इत्यादी माती.
या निसर्गातील सर्वांग सुंदर आविष्कार म्हणजे इंद्रधनुष्य आणि दवबिंदू. दोन्ही केवळ विलोभनीय! “ता ना पी ही नि प जा” मोजे पर्यंत हा इंद्रधनुष्य गायब देखील होतो. क्षणिक भेट पण अत्यंत सुखावणारी. आणि दवबिंदू??? तो नितळ, पारदर्शक बिंदू तर मनाचा ठाव घेणारा. स्वतःत मस्त असणारा, स्वतःचा रंग ल्यालेला….या अफाट, विस्तीर्ण निसर्गाच्या केवळ “रंगाचे” देखील वर्णन करणे खरेच कठीण आहे.
या विधात्याचे खरे आभार. हे सुंदर रंग अनुभवण्यासाठी त्याने आपल्याला नजर दिली. म्हणून तर कळले “जग सुंदर आहे”

बातम्या

Don`t copy text!