नाशिक मिरर विशेष :
दिवसभराची दगदग संपवून आपण कोचावर बसलो असतो. खरेतर डोक्यातून कामाचा व्याप निघालेला नसतो तरीही आपण डोळे बंद करून जरासे मागे टेकून शांत होण्याच्या प्रयत्नात पडलेलो असतो. तेवढ्यात आपलं निरागस पोर जवळ येऊन आपला हात धरतो. केवढी ऊर्जा मिळते तेव्हा! खरंतर आपण त्या चिमुकल्याचा आधार, सरंक्षण. पण त्यावेळी वेगळीच जाणीव होते. त्या इवल्या नाजूक स्पर्शात एक ऊब जाणवते. आणि आपण हरवतो अश्याच उबदार मायेच्या आठवणीत.
आठवतंय का तुम्हाला? थकून भागून रात्री उशिरा घरी आलेले बाबा हातपाय धुताच आधी आईला विचारायचे, “जेवलेत का गं पोरं? आणि शांत निजलेल्या आपल्याला हलकेच थोपटायचे. केसातून अतिशय मायेने हात फिरवायचे. या स्पर्शाने आपल्याला जाग येत असे पण आपण ते प्रेम हृदयी साठवून गाढ झोपेचे उत्तम नाटक करत असू…
तसेच आपण कितीही मोठे झालो तरी आईच्या कुशीत शिरताच तिचा रखरखीत हात जेव्हा आपल्या चेहऱ्यावरून, केसातून फिरतो तेव्हा का कुणास ठाऊक पण गलबलून येते. ती माया आपण कधीच विसरत नाही. अगदी एखाद्या कठीण प्रसंगी आपली जवळची मैत्रीण किंवा मित्र आपल्याला भेटायला येतो तेव्हा आपल्यात काहीही संवाद होत नाही. तो/ ती फक्त आपला हात हातात घट्ट धरते आणि दुसऱ्या हाताने थोपटते. आपले डबडबलेले डोळे केवळ तिच्याकडे बघत राहतात आणि तिची नजर आपल्याला आश्वस्थ करते. “सगळे काही ठीक होईल” या भेटीत सुद्धा असते प्रचंड उबदार माया. एवढेच कशाला, कधीतरी आपली नजर सहज जाते एखाद्या जुन्या गोधडीकडे. जाड दोऱ्याने, विशिष्ट पद्धतीने मारलेल्या टाक्यांमध्ये मन अलगद अडकत जातं. आपण गोधडीला स्पर्श करतो आणि कुणाच्यातरी आठवणीने व्याकुळ होतो. ती व्यक्ती पुन्हा भेटते आपल्याला त्या प्रेमळ स्पर्शात. नक्की आहे काय ही उबदार माया?
एखादा स्पर्श, सहवास, शब्द मनाला इतका भिडतो की सतत हवाहवासा वाटतो. हा स्पर्श, सहवास अगदी शब्द देखील कुणाचेही असू शकतात. कुठल्याही नात्यात ते गवसु शकतात. “दडवून ठेवलेले अश्रू जेथे आपोआप ओघळतात आणि मनावर असलेला प्रचंड ताण काहीही न बोलता, रिता रिता होतो तेथे असते मायेची ऊब……..!”
ही जाणीव असते कुणीतरी आपलं आहे, आपल्या अगदी हक्काचं आहे. इथे जिव्हाळा असतो, नात्याचा ओलावा असतो. स्पर्श किंवा शब्द जिथे आसुसले असतात आपल्याला उभारी द्यायला ती असते मायेची ऊब! म्हणूनच कितीही व्यस्त असलात तरी ही आपली हक्काची माणसं जपता आली पाहिजे. त्यांना आपला फार वेळ नकोच असतो, हवी असते क्षणभराची आपुलकी. बदल्यात मिळते मणभर मायेची ऊब!!!

