नाशिक मिरर :
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने आतापासूनच जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. महत्त्वाचे म्हणजे नाशिक महापालिकेची निवडणूक पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाणार आहे. त्यामुळे राऊत यांनी नाशिककडे आपले लक्ष केंद्रित केले असून, इतर पक्षातील नेत्यांना गळाला लावण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू केले आहे. काल दुपारी माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम यांनी संजय राऊत यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येते शिवसेनेत प्रवेश केला. प्रेम पाटील यांच्या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ९ व सातपूर परिसरात शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे दिसून येत आहे.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत सुरू झालेले इनकमिंग शिवसेनेसाठी चांगले मानले जात आहे. काल शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या कार्यक्रमात प्रेम पाटील यांच्या सह त्याच्या समर्थकांनी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यावेळी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, अजय बोरस्ते, नगरसेवक विलास शिंदे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. पक्ष प्रवेश झाल्यानंतर प्रेम पाटील यांच्या समर्थकांनी सातपूर सह शिवाजी नगर परिसरात चारचाकी वाहनातून मिरवणुक काढत नागरिकांचे आशिर्वाद घेतले. नंतर प्रेम पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या मातोश्रींनी औक्षवन करुण माजी महापौर दशरथ पाटील यांचे आशिर्वाद घेतले.यावेळी सातपूर विभागातील ज्येष्ठ शिवसैनिक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख , यांनी प्रेम पाटील यांचा पुष्पगुछ्च देऊन स्वागत केले. प्रेम पाटील हे माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र आहेत. दशरथ पाटील यांनी शिवसेनेकडून महापौरपद सांभाळले होते. नाशिक मध्ये चांगल्या प्रकारे कामही केले होते. तसेच त्यांनी २००९ मध्ये शिवसेनेतर्फे नाशिक लोकसभेची निवडणूक लढविली होती. याप्रसंगी परशराम शिंदे,रमेश धात्रक, प्रकाश रोहम, यांच्या सह धृवनगर शाखा प्रमुख प्रविन इंगौले, शिवाजी नगर शाखा प्रमुख संतोष पवार, सुनिल पाटील, अभिजित गोदडे ,जितेंद्र केदार,नितिन पाटील, यांच्या सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
