नाशिक मिरर विशेष :
ओबडधोबड दगडाला
शेंदूर त्याने फासला
हात जोडून श्रद्धेने
शांत तेथे बसला
भावना ऐकून घेणारा
श्रोता त्याला भेटला
भाबडा गडी त्यालाच
देव समजला
नित्य येई भेटीला
काहीबाही सांगायला
दोन घडीची भेट
उभारी देई मनाला
बोलणाऱ्या माणसांत
ऐकणारा नव्हता गवसला
दगडाच्या देवातच
सखा त्याने शोधला
दगडातच देव शोधणाऱ्या आणि देवाला सखा मानणाऱ्या माणसाला कल्पनाच नव्हती की त्यांच्यातीलच काही धुरंदर याचे बाजारीकरण करतील आणि आस्तिक नास्तिक अशी फूट पाडतील. खरंतर हा श्रद्धेचा, आस्थेचा, भक्तीचा आणि मानण्याचा भाग आहे. असे सरसकट आस्तिक किंवा नास्तिक यांत माणसाचे विभाजन करणे अवघड आहे. कारण स्वतःच्या सोईनुसार आस्तिक आणि नास्तिक होणारे असंख्य आहेत.
लेखिका : रेणू कुबडे, पुणे (एम.एस.सी.ऍग्रीकल्चर)
देवाला जो मानतो तो आस्तिक अशी सर्वसामान्य समजूत आहे. भक्तीने, श्रद्धेने जो मनुष्य देवाची पूजा अर्चा करतो, त्याला आस्तिक असे म्हणता येईल. पण ही भक्ती डोळस असते, समजून उमजुन देवाचारणी लीन होणे असते. स्वतः भोवती सकारात्मक वलय निर्माण करणे असते. ऊर्जेचा अव्याहत स्रोत अनुभवणे असते.
भीतीपोटी निर्माण झालेली अंधश्रद्धा अन त्यासाठी देवाच्या नावाखाली केलेले उपास तापास, दानधर्म याला आस्तिकता म्हणता येणार नाही. “देव” ही एक संकल्पना आहे. कुणी ती स्वीकारतो, कुणी नाकारतो. जे स्वीकारतात त्यांच्यासाठी देवाचे अस्तित्व चराचरात सामावलेले असते. विविध रूपात, अनेक प्रसंगात तो या आस्तिकांना भेटत राहतो आणि त्यांच्यातील नाते अधिक दृढ होत जाते. कर्तव्य बजावत असताना, कर्म करत असताना हातून काही वाईट कृत्य घडू नये म्हणून अश्यांच्या मनावर वचक असतो. आयुष्याला चांगले वळण लागावे म्हणून ही आस्तिकता लहानपणापासून आपल्यात रुजवल्या जाते.
देव मानणारी पण देवाचे बाजारीकरण नाकारणारी एक विचारधारा म्हणजे “आस्तिकता”

