नाशिक मिरर विशेष लेख : 

सदनिकेत नवीनच राहायला आलेल्या काकूंकडे एकदा जाणे झाले. गप्पागोष्टी, खाणेपिणे झाल्यावर मी निघाले तश्या काकू म्हणाल्या, “बाळा, जरा हळदी कुंकू लावून घेतेस का? तुझे तूच लाव” त्यांचे यजमान नव्हते त्यामुळे त्या तश्या बोलल्या. मी म्हणाले, काकू, “अहो, लावा की तुम्ही. चालेल मला” तरी त्या संकोचल्या होत्या. मी परत बोलले, “काकू तुम्ही माझ्या आई सारख्या आहात.

लावा तुम्हीच”  आजही समाजात अश्या अनेक स्त्रिया आहेत ज्या पती निधनानंतर स्वतःहून बऱ्याच ठिकाणी माघार घेतात. स्वतःच जग रंगहीन करून घेतात. अश्यावेळी या समाजाचा घटक म्हणून आपण त्यांना उभारी का देऊ नये? आपला जोडीदार गमवल्यानंतर त्या स्त्रीची सांसारिक जबादारी तर संपत नाही, मुलाबाळांच्या रूपाने ती तर निभावायची असतेच. मग आपण का तिचे काही अधिकार हिरावून घेतो?
आता मकर संक्रात येतेय. सवाष्ण स्त्रियांची लगबग सुरू होईल. तिळगुळ, हळवा, हलव्याचे दागिने, वाणात द्यायच्या वस्तू, साड्यांची तयारी… आणि बरेच काही. सगळी कडे उत्साह असेल. ते छानच आहे. पण होतं काय, हल्ली आपण सगळे साधारण सदनिकेत राहतो, किंवा स्वतंत्र बांगला असला तरी हळदी कुंकू घ्यायला बोलावतांना असे निवडून बोलावणे किती वाईट दिसते.

खरंतर आपल्याला ही वाईट वाटत असते पण रीत मोडायची नसते किंवा त्यांना काय वाटेल? हाच विचार मनात असतो. त्यापेक्षा आपण सगळ्यांना “तिळगुळ घ्यायला या” असे म्हटले तर? मी तरी असेच म्हणते आणि सगळ्यांनाच बोलावते. आपणही महत्वाचा भाग आहोत ही भावना त्यांच्यात निर्माण होते तेव्हा आनंद होतो आणि हे आनंदी चेहरे वातावरण अधिक उल्हसित करतात.

लग्न न केल्यामुळें किंवा लग्नानंतर वेगळ्या झालेल्या अश्या एकट्या राहणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत देखील आपण बरेच वेळा चुकतो. एकतर आपण त्यांना बिचाऱ्या तरी समजतो नाहीतर अति हुशार. हा शिक्कामोर्तब कशासाठी? सामाजिक भान सांभाळून स्वतःच्या आयुष्याला हवा तसा आकार देण्याचा अधिकार त्यांना आहेच ना? हे आपण का समजू शकत नाही? अश्या एखादीला चुकून जरी घरी यायला वेळ झाला तर आपले डोळे लगेच मोठे होतात आणि कान तीक्ष्ण! अहो ज्याची अडचण त्यालाच ठाऊक! आपण उगाच तर्क काढीत बसतो.
आणि स्वतःचा संशय कल्लोळ करून घेतो.

अजून एक, कुणाची ओटी भरायची असेल तर जिला मुलबाळ नाही तिला डावलल्या जातं अनेक वेळा. आणि वर्दी लागते ती एखाद्या लेकुरवाळीची. त्यात ही पहिला मुलगा असेल तर उत्तम! हेतू जरी उदात्त असला तरी जिला दुर्लक्षित केलं गेलंय तिच्या मनावर केवढा ओरखडा बसत असेल जाणलय का कधी? काही रीतिरिवाज, रूढी परंपरा काळानुरूप बदलायच्या असतात.

तो बदल अपरिहार्य असतो. समाजहिताचा असतो.
आपले विचार थोडे तपासून बघूया, थोडा बदल करूया…….

Don`t copy text!