नाशिक मिरर विशेष :

टिंग टॉंग!!!

कोण आले रे? अरे बाबा आले.

पिल्लू साठी काय आणलंय? बॉ…ल! आ…हा… छान छान बॉल.

     बाळासाठीचे पाहिले खेळणे अश्या पद्धतीने घरात येते. त्या आधी पाळण्याला वर लावायचे गडद रंगाचे प्लास्टिकचे झुंबर सारखे चावी दिल्यावर गरररर फिरणारे खेळणे बाळा साठी आणलेले असते पण ते फक्त बाळाने त्या कडे टुक टुक बघण्यासाठी. अगदी एक दोन महिने त्याचा उपयोग. त्या नंतर येतो खुळखुळा…. छान छान रंगाचा छुम छुम वाजणारा. हे सुद्धा बाळ एका जागी आहे तो पर्यंतच. एकदा का बाळ रांगायला लागले की बॉल(चेंडू) हा बाळासाठी उत्तम पर्याय. लाल, पिवळ्या, निळ्या बॉलला इवल्याश्या हाताने मारत मारत ते आनंदाने पुढे सरकत जाते. बाळाला आत्मविश्वास देणाऱ्या तबडक तबडक घोडोबाची मग एन्ट्री होते आणि बालगीतांचे सूर घरात घुमू लागतात.

बाळाला खूप सारी खेळणी पहिल्यांदा मिळतात ते त्याच्या पहिल्या वाढदिवसाला आणि तेव्हापासूनच बाळा पेक्षा जास्त पालक “खेळण्यात” अडकतात. ती खेळणी जणू त्यांच्यासाठीच असतात. नीट खेळायचे, तोडायचे नाही, एका वेळी एकच खेळायचे या सर्वांशी बाळाचा काय सबंध? पण पालक लावतात आणि वैतागतात. कारण बाळ पालकाच्या नाही स्वतःच्या स्टाइलने खेळतो!

मला लख्ख आठवतेय, माझ्या मुलाचा पहिलाच वाढदिवस होता. जवळचे काही स्नेही आले होते. त्यात आमच्या घरमालक काकू पण होत्या. त्यांनी राखाडी रंगाची सुंदर कार मुलाला गिफ्ट म्हणून आणली होती. त्याही इतक्या अधीर की मी त्यांना फराळाचे देई पर्यंत त्यांनी ती गिफ्टपॅक असलेली गाडी माझ्या निरागस मुलाच्या स्वाधीन केली. आमचं बाळ अतिशय जिज्ञासू. काकूं चे खाणे होई पर्यंत गाडी स्वाहा झाली होती. वरून आमचा छकुला त्यांना ते दाखवत होता. मला इतके लाजल्यासारखे झाले! पण उपयोग काय? एका वर्षाच्या मुलाला काय बोलणार आणि समजवणार? त्यावेळी कुणाचे का असेना पैसे वाया गेल्याचे मला देखील फार दुःख झाले होते कारण आम्ही कधी महागडी खेळणी खेळलोच नाही. सरळ घरातील काठ नसलेल्या वाटी, चमचा, पेला, ताटलीशी आम्ही खेळायचो. थोठे मोठे झाल्यावर रबरी चेंडू, प्लास्टिक चा बॅट बॉल, एखादी बाहुली आम्हाला मिळायची. त्या बहुलीला सुद्धा आम्ही किती किती नटवायचो, तिला कपडे काय शिवायचो. पण गंमत असायची. मऊ मऊ सॉफ्ट टोईज ची तेव्हा फॅशन नव्हती. आता तर मुलांच्या नावाने ती घरात येतात आणि दिवाणखान्यात शोभेची वस्तू म्हणून मिरवतात. मुलांनी घेताच पालक म्हणतात, “मळतील रे” अरे? म्हणजे मग नुसतेच बघायचे का?

एकच मूल असले तरी आपल्या घरात आज अनेक प्रकारची खेळणी उपलब्ध असतात.
काही आपण आणलेली तर काही आलेली. गरज फक्त एकच आहे की ती खेळणी आपल्या मुलांसोबत आपणही खेळण्याची. त्यांच्या आनंदात सामील होण्याची. पसारा होईल म्हणून ती सतत आवरत बसू नये. ही खेळणी मुलांचे विश्व विस्तारत असतात.

 

बातम्या

Don`t copy text!