नाशिक मिरर विशेष :   

गर्भ श्रीमंत, श्रीमंत, उच्च मध्यम वर्गीय, मध्यम वर्गीय, गरीब, दारिद्र रेषे खालील अशी साधारण आर्थिक सुबत्तेवरून पडलेली लोकांची वर्गवारी पहावयास मिळते.

लेखिका : रेणू कुबडे (एम.एस.सी.ऍग्रीकल्चर )नाशिक
   मो.न. 9372206022

मध्यमवर्गीय म्हणजे सारासार विचार! “हे” टोक नाही की “ते” टोक नाही. काळ बदलला, आर्थिक गणितं बदलली तरी मध्यमवर्गीय विचारसरणीत अमुलाग्र बदल झाला नाही आणि होणारही नाही. जनरीत पाळायची म्हणून ते स्वतःपेक्षा लोकांचाच जास्त विचार करतात. ‘लोकं काय म्हणतील?” या विचाराने ते कायम ग्रासलेले असतात. बरेचदा “इकडे आड तिकडे विहीर” अशा परिस्थितीत ते सापडतात. कितीही मनात असले तरी श्रीमंतासारखा माज करता येत नाही आणि घरात काही नसेल तर दाखवता ही येत नाही. प्रसंग निभावून नेण्याची त्यांना सवय असते.

कालचा मध्यम वर्गीय संयमी, निगुतीने संसार करणारा, मूलाबाळात रमणारा, एकदा मिळवलेली नौकरी तडीस नेणारा, आल्या गेल्याचं हसून स्वागत करणारा, सरकारी नियमांचे पालन करणारा, लहान सहान गोष्टीत आनंद मानणारा, चाकोरीबद्ध जीवन शैली असणारा होता. स्वतःला पडलेली पण अशक्य वाटणारी स्वप्न त्याने पुढच्या पिढीला मनापासून आणि खूप आशेने बहाल केली.

आजचा मध्यमवर्गीय म्हणजे कालच्या मध्यम वर्गीयांचे पुढचे पाऊल. तो शिकला, खूप शिकला आणि नौकरी साठी बाहेर पडला, महानगरी, परदेशी स्थिरावला. साजेसा जोडीदार शोधून त्रिकोणी, चौकोनी कुटुंबात रमला. भरपूर पैसा कमावला, नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पण तश्याच गरजा देखील वाढवल्या. राहणीमान उंचावले, फिरणे, बाहेरचे खाणे वाढले. मौज मजेच्या व्याख्या बदलल्या. कामाच्या व्यापात कधी कधी अलिप्तपणा वाढला. परंतु सणवार, उत्सवांना मात्र आपल्या माणसांच्या आठवणीत झुरत राहिला. त्याला आपल्या लोकांची माया आहे, त्यांच्या विषयी आस्था आहे पण “तो” माघारी जाऊ शकत नाही आणि “ते”( म्हणजे कालचा मध्यम वर्गीय हो) स्वतःचं घर सोडू इच्छित नाही. थोडक्यात या पिढीत नात्यांमध्ये संघर्ष निर्माण झालाय. आपल्या माणसांची उणीव त्याला भासू लागलीय. पण त्यावर उपाय मात्र सुचत नाहीयेत. म्हणूनच कदाचित तो पुढच्या पिढीसाठी सजग झालाय. स्वतःच्या एकुलत्या एक किंवा दोन मुलाला वा मुलीला माणसांची किंमत असावी म्हणून तो धडपडू लागलाय.

आपली पुढची पिढी एकटी पडू नये यासाठी तो विचार करतोय. पुढे काय होणार हे आज जरी ठाम सांगता येत नसले तरीपण अनुभवावरून काही निष्कर्ष नक्की काढता येतील. उद्याचा मध्यम वर्गीय हा अधिक चोखंदळ, नवीन तंत्रज्ञानाला आत्मसात करणारा, कल्पक, व्यवसायाकडे ही झुकणारा, भरपूर कमावणारा आणि उडवणाराही असेल. आभासी जगात रमताना कदाचित नात्यांमध्ये फार औपचारिकता पाळणारा नसेल पण त्यातील गोडवा टिकवण्याचा नक्की प्रयत्न करेल.
म्हणूनच म्हणावेसे वाटते, कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करून सुवर्णमध्य काढणारे, पैशापेक्षा स्वतःचा मान जपणारे, शब्दाला किंमत देणारे, स्वाभिमानाने जगणारे, मध्यम वर्गीय. काल होते तसेच आजही आहेत आणि उद्याही असेच राहतील.

बातम्या

Don`t copy text!