नाशिक मिरर वृत्तसेवा :सागर आनप

​             नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या गुरुवारी (दि. २० नोव्हेंबर) रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या असून, या याद्यांवर नागरिकांना हरकती नोंदवण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र, या प्रारूप याद्यांमध्येच गंभीर त्रुटी आणि मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक ९ आणि प्रभाग क्रमांक १० मध्ये झालेला हा घोळ लक्षणीय असून, यामुळे इच्छुक उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.

 

प्रभाग ९ मधून १२ हजार मतदार प्रभाग १० मध्ये समाविष्ट

​प्रभाग रचनेनुसार, कार्बन नाका, श्रमिकनगर, माळी कॉलनी, आयटीआय कॉलनी, गंगासागर नगर, सातमाऊली चौक यांसारखे दाट लोकवस्तीचे परिसर प्रभाग क्रमांक ९ मध्ये येतात. परंतु, प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीमध्ये या परिसरातील मतदार यादी भाग क्रमांक ८० ते ९३ हे थेट प्रभाग क्रमांक १० मध्ये जोडण्यात आले आहेत.

​या घोळामुळे, प्रभाग ९ मधील तब्बल १२ हजार मतदार प्रभाग क्रमांक १० च्या यादीत समाविष्ट झाले आहेत.लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार आणि मोठी तफावत या गोंधळामुळे दोन्ही प्रभागांच्या मतदार आणि लोकसंख्या आकडेवारीमध्ये मोठी विसंगती दिसून येत आहे:

​प्रभाग क्रमांक १०: या प्रभागाची एकूण लोकसंख्या ४५,८७१ असताना, प्रारूप मतदार यादीत मतदारांची संख्या त्याहून जास्त म्हणजे ४६,६४६ इतकी नोंदवण्यात आली आहे. म्हणजेच, लोकसंख्येपेक्षा ७७५ मतदार अधिक दिसून येत आहेत, जो निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभा करणारा आहे.

​प्रभाग क्रमांक ९: याउलट, प्रभाग ९ ची लोकसंख्या ४७,८३५ असूनही, मतदारांची संख्या केवळ ३१,५२१ एवढीच दर्शवण्यात आली आहे. १२ हजार मतदार प्रभाग १० मध्ये जोडल्यामुळे ही मोठी तफावत निर्माण झाली आहे.

इच्छुक उमेदवारांकडून हरकती नोंदवण्याची तयारी :

​प्रभाग ९ मधील १२ हजार मतदार प्रभाग १० मध्ये समाविष्ट झाल्यामुळे आणि मतदार यादीतील आकडेवारी चुकीची झाल्यामुळे या दोन्ही प्रभागांतील अनेक इच्छुक उमेदवारांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. या घोळामुळे निवडणुकीच्या तयारीवर परिणाम होणार असल्याने, प्रभागातील नागरिकांनी व इच्छुक उमेदवारांनी या प्रारूप मतदार याद्यांमधील चुकांविरोधात हरकती नोंदवण्याची तयारी सुरू केली आहे. या गंभीर चुकीबाबत मनपा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

……

Don`t copy text!