नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार

नाशिक मिरर वृत्तसेवा :सागर आनप

       नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाची सेना यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी युतीच्या चर्चांचा ठाम शब्दांत इन्कार करत, भाजप नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

भाजपाकडे शहरातील सर्व प्रभागांमध्ये अत्यंत सक्षम आणि ताकदवान उमेदवार उपलब्ध असल्याने स्वबळावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव यापूर्वीच स्थानिक पातळीवरून पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

सध्या नाशिक महापालिकेसाठी भाजपकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून, सुमारे एक हजार इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचे समजते. त्यामुळे २०१७ प्रमाणेच यंदाही भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे केदार यांनी स्पष्ट केले.

 

गेल्या काही दिवसांपासून भाजप–शिंदे सेना युतीच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. मात्र, भाजप शहराध्यक्षांनी दिलेल्या या अधिकृत स्पष्टीकरणामुळे राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव पडणार असल्याचे मानले जात आहे.

 

नाशिक महापालिका निवडणुकीत आता थेट सामना होणार की नव्या राजकीय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या

Don`t copy text!