नाशिक मिरर वेबटीम : जिल्हा शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या मुलीस पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. संशयित सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपह्रत मुलीला घेऊन तिची आई व मावशी शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. बहिणीला बाळंतपणासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने मुलीची आई धावपळ करीत होती. त्याचवेळी मुलगी झोपल्याने आईने तिला प्रसूती कक्षाबाहेर झोपवले व आई पुन्हा कक्षात गेली. दुपारी दोनच्या सुमारास आई बाहेर आल्यानंतर मुलगी दिसली नाही, म्हणून आईने सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ती आढळून आली नाही. रुग्णालयातील सिसिटीव्ही तपासले असता एक व्यक्ती मुलीला खांद्यावर झोपलेल्या अवस्थेत पळवून घेऊन जाताना आढळला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस तपास करीत आहेत.
