नाशिक मिरर वेबटीम :
कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाईकांना एकीकडे आंदोलन करावे लागत असताना दुसरीकडे मात्र डॉक्टरनेच या इंजेक्शनसाठी चक्क २५ हजार रुपये मगितल्याचा संतापजनक प्रकार पंचवटी परिसरात उजेडात आला आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या जागरूकतेमुळे हा प्रकार समोर आल्याने ‘रेमडेसिव्हिर’साठी काळाबाजार होत असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
डॉ. रवींद्र श्रीधर मुळूक (३६, रा. अमृतधाम, पंचवटी) असे या डॉक्टरचे नाव असून, तो पंचवटी एसटी डेपोसमोरील सद्गुरू हॉस्पिटलचा संचालक असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी या डॉक्टरला अटक केली असून, त्याच्याकडून तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते योगेश मोहिते यांनी पुराव्यांसह पंचवटी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी डॉ. मुळूक याला चौकशीसाठी ताब्यात घेत रात्री उशिरा अन्न व औषध विभागाचे औषध निरीक्षक एस. एस. देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
