कोरोना रुग्णांच्या नातेवाईक कडून होतेय विचारणा ;लोकप्रतिनिधी , सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी मैदानात उतरण्याची हीच ती वेळ !
नाशिक मिरर : कुठे आई-वडील तर कुठे भाऊ-बहीण कुठे काका-मामा, तर कुठे पत्नी-मुलगा यांना ऑक्सिजन बेड हवा आहे. कोणाला रेमडिसिव्हीर इंजेक्शन हवंय, तर कोणाला ऑक्सिजन सिलेंटर, तर कोणाला व्हेंटिलेटर बेड, कोणाला प्लाझ्मा डोनर हवा, तर कोणाला रक्त, कोणी कोविड लसीकरण कुठे सुरू आहे.तर कुठे कोविड लस संपल्या आहेत. कोरोना तपासणी करायची आहे कुठे करून मिळेल, काहीतरी करून बेड साठी जागा करून द्याना ! डॉक्टरांना सांगा ना तुम्ही भाऊ, तुम्ही ऑक्सीजन सिलेंडर बघा भाऊ व्हेटीलेटर बेड कुठे मिळेल ? आई सिरीयस आहे…एच आर सिटी स्कोर २० तर ऑक्सिजन लेवल ८५ वर आहे. प्लाजमा हवा आहे. कोणी डोनर आहेत का ? भाऊ तुम्ही करू शकता ! कराना तेवढी मदत भाऊ, गेल्या काही दिवसापासून फोनवर मन हेलवणारे प्रश्न विचारले जात आहेत.
मात्र या प्रश्नांना काय उत्तर द्यावे काय सांगू त्यांचे समाधान कसे करावे असा प्रश्न लोकप्रतिनिधी , आमदार , सामाजिक कार्यकर्ते, भाऊ,दादा, नाना,समोर निर्माण झाले आहे. कारण समोरून विचारल्या जाणाऱ्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्यासारखी परिस्थिती सध्या तरी नसल्याची खंत त्यांना व्यक्त करावी लागते आहे. तरी देखील लोकप्रतिनिधी , सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी मैदानात उतरण्याची हीच ती वेळ आहे.आणि गरजू रुग्ण व नातेवाईक यांना मदत करण्याची देखील. आपले संपर्क कौशल्यतुन अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. जिल्हा प्रशासन, व मनपा प्रशासन व खाजगी रुग्णालया मधील आरोग्य व्यवस्था कोरोनाचा होत असलेला फैलाव व रोज नव्याने सापडत असलेले रुग्ण, अतिदक्षता रुग्णांची वाढत असलेली संख्या यासमोर कमी पडत आहे. मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासन यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे.परंतु त्या यंत्रणनेवर प्रचंड ताण आला असून, त्याचे हेल्पलाईन क्रमांक सतत व्यस्त आहेत.बेड मिळत नाही म्हणून अनेक रुग्ण घरी राहून अतिअवस्थ परिस्थिती पोहचत असल्याचे परिस्थिती आहे.उपलब्ध असलेले बेड वर रुग्णांना घेऊन पोहचे पर्यंत बेड वर रुग्ण ऍडमिट होत आहेत.
सातपूर मधील रुग्ण लीलाबाई बबनराव आहेर (वय ५५ वर्ष राहणार जाधव संकुल ,सातपूर) यांना ऑक्सिजन बेड ची गरज होती.एचआरसिटी स्कोर २२ तर ऑक्सिजन लेव्हल ७० पर्यंत खाली आलेली. दि ११ एप्रिल रविवार रोजी नाशिक शहरातील सर्व खाजगी व मनपा रुग्णालयात बेड साठी प्रयत्न केले परंतु सर्व ठिकानवरून नकार आला.रुग्ण अत्यअवस्थ असून देखील ,घरी राहून एक दिवस काढला.रुग्णाला फार च त्रास होऊ लागल्याने शेवटी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांना दि.१२ रोजी फोन लावून विचारणा केली.त्यांनी तात्काळ त्याच्या परिचय मध्ये असलेल्या पेठ नाका येथील सिल्व्हर हॉस्पिटलमध्ये डॉ. गांगुर्डे यांच्या कडे उपचार साठी व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून दिला. परंतु अर्ध्या रात्री मदतीला धावणारे काही कार्यकर्त्यांनी देखील अक्षरश हतबलता व्यक्त केली.
यावरून कोरोनाची दुसरी लाट अत्यंत तीव्र असून राज्यात व नाशिक शहरात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.हॉस्पिटल मध्ये बेडची संख्या कमी पडत आहे.औषधे व ऑक्सिजन चा तुटवडा आहे.या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करून ही साखळी तोडणे आवश्यक झाले आहे.लॉकडाऊन मुळे उपचार घेणारे रुग्ण बरे होऊन घरी सुखरूप परत जातील.नव्याने सापडणारे रुग्णांचे प्रमाण घटेल, व बेड चा तुटवडा भासणार नाही. राज्य सरकार जेव्हा निर्णय घेईल तेव्हा घेईल परंतु नाशिक शहरात कोरोना चे सुरू असलेले तैमान थोपवण्या साठी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, मनपा व जिल्हा प्रशासनाने एकत्र येऊन नाशिक लॉकडाऊन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षापेक्षा यंदा तशी परिस्थिती भयंकर कशी ओडवली आहे. कोरोना चा संसर्ग वाढतच असून या वेळी लोकांना व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेड सुद्धा मिळत नाही ,इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून नातेवाईकांना इंजेक्शन साठी मेडिकल बाहेर तासनतास उन्हात ताटकळत उभे थांबावे लागल्याचे चित्र शहरात दिसून आले. इंजेक्शन मिळत नसल्याने आंदोलन करण्याची वेळ आली. अनेकांना गरज असताना, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर वेळ मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो आहे. प्रशासनाकडूनही अविरत प्रयत्न सुरू आहेत. मात्र रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याने प्रशासनाला ही परिस्थिती हाताळताना नाकीनऊ येत आहे.
सातपूर परिसर हा औद्योगिक वसाहती चा परिसर असल्याने मोठ्या प्रमाणात कामगार वास्तव्यास आहेत.कामगारांचे कामाच्या ठिकाणी कामानिमित्त रोज शेकडो लोकांशी काळजी घेऊन देखील संपर्क येत असतो.त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातपूर कामगार वसाहती मध्ये कोरोना फैलाव होत असून सातपूर मध्ये ऑक्सिजन युक्त कोविड सेंटर तात्काळ सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.सातपूर मधील ईएसआय कामगार विमा रुग्णालयाने नगरसेवक सलीम शेख , वर्षा भालेराव, आमदार सीमा हिरे यांचे मागणी निवेदन चा आधार घेऊन ईएसआय रुग्णालयात ऑक्सिजन युक्त कोविड सेंटर सुरू करण्यास सहमती दर्शवली असून मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी तात्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
