नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी

येथे बैलपोळा सण सोमवारी (दि.6) पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. याबरोबरच पिठोरी अमावास्या अन् शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने या दिवसाला अधिक महत्त्व होते.

शेतकरी वर्गाने बैलजोडीसह गाय-वासरू यांना स्वच्छ आंघोळ घातली व त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली आकर्षक झूल..शिंगांना बेगडं..डोक्याला बाशिंग..गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा..नवी वेसन..नवा कासरा..पायात करदोडयाचे तोडे आणि सर्वांगावर गेरूचे ठिपके अशाप्रकारे लक्षवेधी सजावट केली. या सुशोभित बैलजोडीसह गाय-वासरू व अश्व यांची गाव व परिसरात सवाद्य मिरवणूक काढली. ग्रामदैवत मारूती मंदिरासमोर बैलजोडींकडून सन्मानपूर्वक सलामी देण्याचा विशेष कार्यक्रम झाला. ठिकठिकाणी महिलांकडून बैलजोडीसह गाय-वासरू यांचे औक्षण करून पुरणपोळी व सुग्रास अन्नधान्याच्या नैवेद्य दाखविण्यात आला.

 

मातीच्या बैलांचे पूजन : 

यांत्रिक पद्धतीने शेतीमुळे आज ज्या शेतकरी वर्गात बैलजोडी नाही व जे शेतकरी नाही, त्यांनी घरोघरी मातीच्या बैलांचे पूजन करून पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा केला.

ग्रामस्थांच्यावतीने बैलपोळयास योगेश मोराडे, प्रकाश उखाडे, सचिन गायकवाड, सुनील मोराडे, प्रशांत मोराडे, बाळासाहे उखाडे, मोहन गरूड, मोहन बोरस्ते, सोमनाथ वडजे, दिलीप सातकर, प्रशांत बोरस्ते, विकी मोराडे, बंडू गरूड, राहुल सातकर आदींसह जय शिवशंकर मित्रमंडळ, राजा शिवछत्रपती मित्रमंडळ, शिवशंभो मित्रमंडळ, आदीवासी मित्रमंडळ आदींचे सहकार्य लाभले.  बैलपोळानिमित्ताने घराला आंब्यांच्या पानांचे तोरण बांधण्यात आले.

बातम्या

Don`t copy text!