नदीचे पावित्र्य राखण्यासाठी मूर्तीदान करून दिला प्रतिसाद
नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात येथे निरोप देण्यात आला. नागरिकांनी यंदाही शाडू मातीच्या मूर्ती बसविण्यास प्राधान्य दिले व पर्यावरणपूरक विसर्जनही केले.
मेरी-म्हसरूळ भागात गोरक्षनगर, राजमाता मंगल कार्यालयाशेजारी, आरटीओ ऑफिस गेटशेजारी व सीता सरोवर येथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. या ठिकाणी विसर्जन करून मूर्ती दान करण्यात आली. निर्माल्यही जमा केले. त्यामुळे प्रदूषण टळले..
महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांनी पोकार काॅलनीजवळ कृत्रिम तलाव यंदा प्रथमच तयार केला. तेथे विसर्जन व मूर्ती संकलन जोरात झाले. दीपाली गीते यांनी या ठिकाणचे संयोजन केले.

`एक दिवस-गोदावरी नदी व सर्व उपनद्यांचे पावित्र्य राखण्यासाठी’ या मोहिलाही चांगला प्रतिसाद मिळाला. गणेशमूर्ती दान संकलन व निर्माल्य संकलन करण्याचा हा उपक्रम अनेक संस्थाच्या माध्यमातून राबविण्यात आला. नाशिक महानगरपालिका, ग्लोबल इंटरनॅशनल फाऊंडेशन टीम, पोलिस मित्रपरिवार समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने विसर्जनच्या ठिकाणी म्हणजे सीता सरोवर येथील महापालिकेच्या कृत्रिम तलावात विसर्जन व मूर्ती दान करण्यासाठी आवाहन केले व त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.
गणेश पेलमहाले, सुनील परदेशी, किरण काकड, अमित घुगे,लक्ष्मण जगदाळे, दर्शन परदेशी, विरेंद्र परदेशी रोहिणी क्षीरसागर, संजना पगार, अन्नपूर्णा सांळुखे, रोहिणी कुमावत, राजेंद्र लिंबकर, तसेच दीव्यदृष्टी संस्थेच्या वैजयंती सिन्नरकर, क्षितिजा खटावकर यांनी या मोहीमेत काम केले.
