नाशिक मिरर : म्हसरूळ प्रतिनिधी
नोएडा, दिल्ली येथे महाराष्ट्रातील सरपंच, समाजसेवक, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात नाशिक येथील मंगला शिंदे यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुदर्शन चॅनलने याचे आयोजन केले होते.
कोरोना काळात जीव धोक्यात घालून जनसेवा केलेल्या शिंदे यांचा सन्मान अध्यक्ष सुरेश चव्हाण व सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे- पाटील, रामनाथ बोरडे यांनी केला.
शिंदे या ग्रामीण भागातील शालेय व्यवस्था सांभाळून निस्वार्थ सेवा देऊन असंख्य मुला-मुलींना घडवत आहेत. तसेच गरीब, निराधार महिलांना शिवणकाम, पार्लरचे प्रशिक्षण देऊन त्यांचे सबलीकरण करत आहेत. शिंदे या आदर्श इंग्लिश मिडियम शाळेत अनेक वर्षांपासून शालेय व्यवस्थापणावर काम करत आहेत. निराधार महिलांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देणे व अनाथांना अन्न, वस्त्र, वस्तूदान करणे, अशा अनेक क्षेत्रात काम करत आहेत. कोरोना महामारी काळातही त्यांनी ही समाजसेवा सतत सुरू ठेवली.
पुरस्कार वितरणवेळी राज्य संपर्क प्रमुख राहुल ओके, सदाशिव डोंगे, डॉ. नंदकुमार गोडगे यांच्या हस्ते पुरस्काराचे राष्ट्रीय स्तरावरील एकूण २१ महिला आणि पुरुष यांना वितरण करण्यात आले.
—-
