नाशिक मिरर : प्रतिनिधी

             ज्येष्ठ वास्तुविशारद व `आयआयए’च्या राष्ट्रीय परिषदेचे माजी अध्यक्ष आर्किटेक्ट प्रफुल्ल कारखानीस यांना २०२१ साठीचा ‘आयआयए – निर्मिती जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
             द इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस् (आयआयए), नाशिक सेंटर व निर्मिती पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वास्तुकला व्यवसायात व संस्थेत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या ज्येष्ठ वास्तुविशारदांना ‘जागतिक वास्तुकला दिनाच्या’ पार्श्वभूमीवर, ‘आयआयए– निर्मिती जीवनगौरव’ पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. त्यातंर्गत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ख्यातनाम वास्तुविशारद व `आयआयए’च्या राष्ट्रीय परिषदेचे माजी विश्वस्त आर्किटेक्ट माधव देवभक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. `आयआयए’च्या नाशिक सेंटरचे अध्यक्ष रसिक बोथरा यांनी स्वागत केले. संजीव बोरसे यांनी निर्मिती पतसंस्थेबद्दल माहिती दिली. जीवनगौरव सोहळ्यास उपस्थित असलेले शहरातील वास्तुकला महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच अन्य मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
  या सोहळ्यात आर्किटेक्ट कारखानीस यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रफित सादर करण्यात आली. ज्येष्ठ वास्तुविशारद जफर बकीर व चंद्रकांत धामणे यांनी घेतलेल्या प्रत्यक्ष मुलाखतीत, आर्किटेक्ट कारखानीस यांनी आपला जीवनप्रवास उलगडत वेगवेगळ्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.
संस्थेच्या कार्यकारणी सदस्या रोहिणी मराठे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. `आयआयए’च्या नाशिक सेंटरचे अध्यक रसिक बोथरा यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. आर्किटेक्ट माधव देवभक्त यांनी कारखानीस यांचा प्रांजळपणा, वक्तशीरपणा आणि सगळ्यांना एकत्र घेऊन वाटचाल करणे, या गुणांचा विशेष उल्लेख केला.
संस्थेच्या खजिनदार स्मिता कासार-पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष देवभक्त व मीरा देवभक्त यांच्या हस्ते कारखानीस यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. वास्तुकला परिषदेचे माजी अध्यक्ष विजय सोहोनी, निर्मिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गुप्ता, `आयआयए’च्या महाराष्ट्र चॅप्टरचे उपाध्यक्ष प्रवीण पगार, संस्थेचे अध्यक्ष रसिक बोथरा व संस्थेचे उपाध्यक्ष समीर कुलकर्णी यांच्या हस्ते कारखानीस यांना मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
सोहळ्याच्या अखेरीस, सत्कारमूर्ती कारखानीस यांच्या हस्ते संस्थेचे सदस्य प्रवीण सरागे, विजय पवार यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अर्चना पेखळे व रोहित दर्डा यांचादेखील सत्कार करण्यात आला.

यांनी घेतले परिश्रम

संस्थेचे सचिव रोहन जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे सह-सचिव शार्दुल विश्वकर्मा व कार्यकारणी सदस्य कौशल कटाळे, अमोल चौधरी, अंकित मोहबन्सी, सतीश पवार, अजय देवरे, गौरव बडवे, विश्वनाथ शेळके, तसेच संस्थेचे सदस्य विवेक विभूते यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या

Don`t copy text!