नाशिक मिरर :
महानगरपालिकेने जाहीर केलेली प्रारुप प्रभाग रचना सातपूर विभागातील विद्यमान नगरसेवकांना तसे म्हटल्यास फारशी अडचणीची न ठरता फायदेशीरच ठरणार आहे.मात्र काही नगरसेवकांचे थोडेफार हक्काचे मतदान शेजारील प्रभागाला जोडले आहे. पूर्वीच्या पाच प्रभागांची सहा प्रभागात विभागणी करुन नव्याने दोन प्रभाग जोडण्यात आले आहेत.त्यामुळे सातपूर विभागात आता आठ प्रभाग होणार आहेत.
महानगरपालिकेने सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीची प्रारुप प्रभाग रचना मंगळवारी घोषित केली आहे.या प्रारुप प्रभाग रचनेचा विचार करता आदीच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेनेचे विलास शिंदे, संतोष गायकवाड,नयना गांगुर्डे, राधा बेंडकुळे यांच्यासाठी नवीन प्रभाग (प्रभाग क्रमांक 11) रचना फायदेशीर ठरणार आहे.त्यांचा मतदार संघ शाबूत राहिला आहे.
तर आदीचा प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपाचे दिनकर पाटील यांचाही प्रभाग शाबूत राहिला आहे.उलट त्यांचा प्रभाव असलेला शिवाजीनगर,ध्रुवनगर, धर्माजी कॉलनी हा हक्काचा भाग नव्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये तसाच राहिला आहे.
तर प्रभाग क्रमांक 9 चा काही भाग आणि प्रभाग क्रमांक 10 चा काही भाग मिळून नव्याने प्रभाग क्रमांक 13 तयार करण्यात आला आहे.
त्याचाही फायदा विद्यमान नगरसेवक हेमलता कांडेकर आणि इंदूबाई नागरे यांना होणार आहे.
तर पूर्वीचा प्रभाग क्रमांक 11 हा नव्या दोन प्रभागात विभागला गेला आहे.नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये पूर्वीचा सातपूर गाव आणि जाधवसंकुल,समतानगर,निलकंठेश्वरनगर,सातपूर कॉलनी हा भाग जोडण्यात आला आहे.नव्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये मनसेचे विद्यमान नगरसेवक सलीम शेख,योगेश शेवरे तसेच शिवसेनेच्या सीमा निगळ यांना लाभदायकच ठरणार आहे.
नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये एमआयडीसी परिसर,महादेववाडी,स्वारबाबानगर, प्रबुद्धनगर,कांबळेवाडी,संतोषीमातानगर,सदगुरुनगर या भागांचा समावेश असल्याने आरपीआयच्या विद्यमान नगरसेविका दीक्षा लोंढे यांना हक्काचा प्रभाग मिळणार आहे.
तर आदीच्या प्रभाग क्रमांक 26 हा नवीन तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक 34 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.जुन्या प्रभाग क्रमांक 26 मधील काही भाग शेजारील प्रभागाला जोडला असला तरी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक मधुकर जाधव आणि भागवत आरोटे यांचा हक्काचा भाग शाबूत राहिला आहे.
सातव्या पंचवार्षिक निवडणुकीत सातपुर विभागाला शिवनगर,बजरंगनगर,सावरकरनगर,शंकरनगर, नरसिंहनगर,सौभाग्यनगर,श्रमिक कॉलनी,एसटी कॉलनी,थत्तेनगर,डिसुझा कॉलनी हा प्रभाग क्रमांक 10 नव्याने जोडण्यात आला आहे.त्याचबरोबर महात्मानगर, कामगारनगर,पिटीसी,परिजातनगर,कृषिनगर,एचपीटी कॉलेज,रामदास कॉलनी,शरणपूर गावठाण,कुलकर्णी गार्डन,उत्कर्षनगर,सिद्धार्थनगर,पी अँड टी कॉलनी,लवाटे नगर हा नवा प्रभाग क्रमांक 16 देखील सातपूर विभागाला जोडण्यात आला आहे.
इच्छुक झाले सोशल मीडियावर ॲक्टिव्ह
प्रभाग रचना जाहीर होताच, इच्छुकांनी आपापल्या सोयीचा प्रभाग निवडत लागलीच सोशल मीडियावर ॲक्टिव होत प्रचार सुरु केल्याचे दिसून आले. अनेकांनी तर आपापले तर्क वितर्क लावत प्रभागातील आरक्षण जाहीर करत आपापला प्रचार सुरू केल्याचेही दिसून आले.नगरसेविका कांडेकर घेणार हरकत-
प्रभाग क्रमांक ९ मधील विद्यमान नगरसेविका हेमलता कांडेकर यांचा प्रभाग काही प्रमाणात तुटल्याचे दिसून आले. सद्यस्थितीत प्रभागातील महत्वाचा परिसर इतर प्रभागाला जोडला गेल्याने आपण हरकत घेणार असल्याचे यावेळी त्या बोलत होत्या.
