नाशिक मिरर : समृद्धनगर ते बारदान फाटा या अशोकनगर रस्त्या दरम्यान सुरू असेलल्या दुभाजकाचे काम थांबविण्याचा निर्णय अखेर मनपा प्रशासनाने घेतला आहे. रस्ता अरुंद असून देखील रुंदीकरण करण्या अगोदर दुभाजका चे काम सुरू होते.पंरतु संथ गतीने सुरु असलेल्या या कामामुळे या ठिकाणी अपघाताची मालिका सुरू असून प्रसार माध्यमांनी व नाशिक मिरर ने वेळोवेळी यावर प्रकाशझोत टाकत मनपाच्या भोंगळ कारभाराचे दर्शन घडवले होते.
त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील समृद्धनगरपासून अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर ते बारदान फाटा रस्त्यावर दुभाजक टाकण्याचे काम संथ गतीने सुरु आहे. हे काम वाहनधारकांसाठी अपघाताचे केंद्र बिंदू ठरत आहे. गेल्या सहा महिन्यात शेकडो अपघातामध्ये अनेकांना जायबंदीस सामोरे जावे लागले तर अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे.
दरम्यान, याच ठिकाणी झालेल्या अपघातात जाधव संकुल मधील उमेश मेदने यांचा काल मंगळवारी (दि.१५) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा रस्ता आणखी किती जीव घेणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागल्याने, खडबडून जाग आलेल्या मनपा प्रशासनाने आज पाहणी दौरा करत काम थांबविण्याचा निर्णय घेतला. यावेळी नगरसेवक शशिकांत जाधव, माजी नगरसेवक नंदू जाधव, सामाजिक कार्यकर्ते विजय बुरकूल, सुखदेव आंधळे, नाना वाघ यांच्यासह सातपूर मनपाचे बांधकाम उपअभियंता कोल्हे, संजय घोलप, अतिक्रमण विभागाचे तानाजी निगळ उपस्थित होते.
अन्यथा आत्मदहन करणार
मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मेदने कुटुंबीयांसह या ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी. संपूर्ण रस्ता रुंदीकरण झाल्याशिवाय दुभाजक टाकल्यास आत्मदहन करणार
– विजय बुरकूल, नागरिक
अपूर्ण अवस्थेतील काम पूर्ण करत, पुढील दुभाजक टाकण्याचे काम रस्ता रुंदीकरणानंतरच होईल. रस्ता रुंदीकरणासाठी लागणारा एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
– शशिकांत जाधव, नगरसेवक प्र. क्र. १०
