एक फरार, सहा मदतगारही ताब्यात

मालेगाव : नाशिक मिरर वेबटीम
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात बांग्लादेश मधून घुसखोरी करत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर या घटनेची स्थानिक पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे. बेकायदेशीररित्या मालेगावात वास्तव्य करणार्‍या दोन बांग्लादेशी नागरिकांना अटक झाली असून , एक फरार होण्यात यशस्वी ठरला आहे. तसेच या घुसखोरांना बनावट कागदपत्र मिळवून दिल्याप्रकरणी सहा संशयित स्थानिकांनाही पोलिसांनी पकडले आहे. आयशानगर व पवारवाडी हद्दीत ही कारवाई झाली. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन तीव्र विरोध प्रदर्शन झालेल्या मालेगावात बांग्लादेशी घुसखोर आढळून येण्यास प्रारंभ झाला आहे. बनावट आधारकार्ड व पासपोर्टच्या निमित्ताने सानपाडा पोलिसांनी मालेगावातील दलालाला अटक केल्याच्या आठवड्याभराच्या आत तीन बांग्लादेशी अनधिकृतपणे मालेगावात वास्तव्याला असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. तत्पूर्वीच एकाने पलायन केल्याने इतरही ठिकाणी आश्रयस्थान असल्याचे अधोरेखित होते.
मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक सचिन पाटील व अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी या विषयाला हात घातला. शहर व कॅम्प उपविभागात दि. 1 ते 6 नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यात हजारखोलीमधून आलम आमीन अन्सारी (38) या बांग्लादेशीला अटक करण्यात आले. त्याच्या पासपोर्टवर रू. नं. 242, ग.नं.2, हजारखोली असा पत्ता दिला आहे. त्याच्यासह जाहीर हाशीम हनिबा नामक बांग्लादेशी नागरिकही निष्पन्न झाला असला तरी तो फरार आहे. त्यांच्याविरोधात आयशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, संशयित आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
याचप्रमाणे पवारवाडी हद्दीतून ताहिर अली युसुफ अली (25) याला अटक झाली आहे. तो मुळचा नैकुलसुरी, जि. बांदरबन, बांग्लादेशचा रहिवासी असला तरी तो मालेगावातील शाही गोल्डन हॉटेलच्या पाठीमागील शेडमध्ये वास्तव्याला होता. या बांग्लादेशींना भारतीय नागरिकत्व सिद्धतेसाठी सहा स्थानिक नागरिकांनी मदत केल्याचे तपासात पुढे आले आहे.
मुंबई पोलिसांनी मालेगावातील आधारकार्ड केंद्रचालकास अटक केली. तेव्हा संगणक, लॅपटॉप आदी साहित्य जप्त केले होते. त्यानंतर स्थानिक पातळीवर सखोल चौकशी सुरु झाल्याने बांग्लादेशी व त्यांना मदत करणार्‍यांची यादी वाढत चालली आहे.

 

चौकशीतून बनावट कागदपत्रे उघड
आरोपींच्या ताब्यातून बनावट कागदपत्र जप्त करण्यात आले आहेत. मालेगाव महापालिकेचे बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवून त्याआधारे आधारकार्ड, पॅनकार्ड, पोस्टात बचत खाते उघडण्यात आले. यासाठी लोकप्रतिनिधींच्या लेटरहेडचा ओळखीसाठी वापर झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रक्रियेत शेख अशपाक शेख मुनाफ कुरेशी (रा. हजारखोली), एकलाख मोहम्मद मुस्तफा (रा. नयापुरा, शेख इमरान शेख रशीद (रा. नागछाप झोपडपट्टी), इक्बाल खान मुनीर खान (रा. तंजीबनगर), ललित नाना मराठे (रा. कैलासनगर), जाकिर अली अब्दूल मजीद खान (रा. अखतराबाद) या स्थानिक सहा लोकांनी सहाय्य केल्याचा वहिम आहे. तसेच ठेकेदार समसुल हुदा (रा. अलीगड, उत्तरप्रदेश) याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. तो वगळता संशयितांना अटक झाल्याचे कळते. त्यांच्या चौकशीतून अजुन किती बांग्लादेशींना बनावट कागदपत्र पुरविण्यात आलेत, हे उघड होईल.दरम्यान, पवारवाडी पोलिसांनी मुख्य संशयित ताहिरसह युनूस शेख रहिम शेख व मुदस्सीर एकलाक अहमद या तिघांना अटक केली असून, त्यांना शनिवारी सकाळी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

बातम्या

Don`t copy text!