नाशिक मिरर वृत्तसेवा │ सातपूर
सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या संतोषीमाता नगरमध्ये नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी समोर आली. सततच्या घरगुती वादातून सख्या भावाने आपल्या लहान भावाचा धारदार शस्त्राने वार करत खून केल्याने परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खून झालेल्या तरुणाचे नाव करण शिंगाडे (वय अंदाजे ३०) असून, आरोपी म्हणजेच त्याचाच मोठा भाऊ अर्जुन शिंगाडे याला सातपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. पोलिसांनी केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे परिसरात तणाव निर्माण होण्याआधीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
काय घडलं नेमकं?
संतोषीमाता नगर परिसरात राहणाऱ्या शिंगाडे कुटुंबात गेल्या काही काळापासून करण आणि अर्जुन या दोन भावांमध्ये वैयक्तिक कारणांवरून सतत वाद होत असत. बुधवारी दुपारी असाच वाद उफाळून आला आणि काही वेळातच त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात अर्जुन याने आपल्या लहान भाऊ करणवर धारदार शस्त्राने पाटलून वार केले. गंभीर जखमी झालेल्या करणला शेजाऱ्यांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलीस यंत्रणेची तत्पर कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विश्वास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि माहितीच्या आधारे काही तासांतच आरोपी अर्जुन शिंगाडेला ताब्यात घेतले.
तपास पथकात पुढील अधिकारी आणि कर्मचारी होते सहभागी:
उपनिरीक्षक न्याहालदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप, पोलीस कॉन्स्टेबल राकेश रसाळ, सागर गुंजाळ आदींनी संयुक्तपणे तपास करत आरोपीला अटक केली.
परिसरात भीतीचं वातावरण; अफवांना थारा देऊ नका – पोलीसांचे आवाहन
या घटनेनंतर संतोषीमाता नगर परिसरात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. नागरिकांमध्ये अस्वस्थता असून, काही अफवा पसरवल्या जात असल्याचे लक्षात आल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
