नाशिक मिरर वृत्तसेवा |सागर आनप

       गेल्या चार वर्षांपासून रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया अखेर मार्गी लागण्याची चिन्हं आहेत. राज्याच्या नगर विकास विभागाने राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषद व नगर पंचायतींसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत.

 

कशी असेल नव्याने प्रभाग रचना?

अ, ब, व क वर्गातील महापालिकांसाठी: चार सदस्यांचा प्रभाग

नगर परिषदेसाठी: दोन सदस्यांचा प्रभाग

नगर पंचायतीसाठी: एक सदस्याचा प्रभाग

 

 

भाजप सरकारच्या कार्यकाळात लागू असलेली चार सदस्य प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे. याआधी महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्य प्रभाग योजना लागू केली होती, परंतु ती आता रद्द करण्यात आली आहे.

 

लोकसंख्या गृहीत धरून नवी आखणी

नव्या रचनेत 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ब्लॉक गृहीत धरले जाणार आहेत. तसेच, 2017 मधील रचना आणि त्यामधील किरकोळ बदल, नवीन रस्ते व सीमा यांचा विचार करून नव्या प्रभागांची आखणी केली जाणार आहे.

 

काय घडले होते मागील काळात?

ओबीसी आरक्षण आणि इतर मुद्यांवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने निवडणुकीला स्थगिती आली होती. मात्र आता न्यायालयाने स्थगिती उठवत पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.

दिवाळीपूर्वी मतदान शक्य

नव्या आदेशांनुसार आगामी दोन महिने ही प्रभाग रचना प्रक्रिया सुरू राहणार आहे. पावसाळ्यानंतर मतदानाची शक्यता असून, दिवाळीपूर्वी निवडणूक होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 

बावनकुळे यांचा संकेत

नुकत्याच नाशिक दौऱ्यावर आलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ऑगस्ट महिन्यात निवडणूक अधिसूचना जाहीर होण्याचा संकेत दिला होता.

 

राजकीय हालचालींना वेग

या आदेशांमुळे विविध पक्षांच्या नेत्यांची रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी इच्छुकांच्या गोटातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

बातम्या

Don`t copy text!