नाशिक मिरर वृत्तसेवा :सातपूर
अनादी काळापासून वारकरी संप्रदायाची परंपरा जपत संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान करत असते. याच पारंपरिक आणि अध्यात्मिक परंपरेचा भाग म्हणून यंदाही पालखीचा दुसरा मुक्काम बुधवारी (दि. ११ जून) सातपूर गावात मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडला.
पालखी आगमनाच्या निमित्ताने सातपूर गावात चैतन्याचे वातावरण पसरले होते. स्वागतासाठी एक महिना आधीपासूनच जोरदार तयारी सुरू करण्यात आली होती. या वर्षी पालखी स्वागत समिती गठीत करण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष निलेश भंदुरे, कार्याध्यक्ष सुनील मौले, नितीन निगळ यांच्यासह गोकुळ निगळ, विजय भंदुरे, शांताराम निगळ, अमर काळे, माजी नगरसेविका सीमा निगळ, तुकाराम बंदावने व अनेक ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होता.
उत्कृष्ट व्यवस्थापन:
वारकऱ्यांच्या आणि भाविकांच्या कोणत्याही गैरसोयीबाबत दक्षता घेत निवास, स्नान, चहा-नाश्ता, सुरळीत भोजन, शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध करण्यात आली होती. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन या यथाशक्ती सेवा केली.
सातपूरमध्ये स्वागत यात्रा आणि बँडपथकाची रंगत:
पालखीच्या स्वागतासाठी पपय्या नर्सरीपासून सातपूर गावापर्यंत भव्य स्वागत यात्रा काढण्यात आली. बँडपथकाच्या गजरात वारकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने सहभागी होत वातावरण भक्तिमय केले. संपूर्ण परिसर “ज्ञानोबा माऊली तुकाराम”च्या जयघोषाने दुमदुमला.
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज पालखीचा पहिला मुक्काम गेली जवळपास १८५ वर्षे पासून सातपूर गावातच होत आला आहे. परंतु यावेळी सातपूर गावात पालखीचा दुसरा मुक्काम होतो.त्यामुळे सातपूरकर ग्रामस्थांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. या दिवशी विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, व्यापारी, उद्योजक मंडळी सातपूरला हजेरी लावतात. ग्रामस्थ भाविकांची सेवा करण्यास नेहमीच तत्पर असतात.
यंदाचा विशेष उपक्रम:
यंदा पहिल्यांदाच जनता विद्यालय आणि श्री छत्रपती शिवाजी भाजी मंडईचा पालखी स्वागतासाठी मुक्काम साठी समावेश करण्यात आला. पावसाचा अंदाज लक्षात घेता जनता विद्यालयात वाहनतळ (पार्किंग) व्यवस्था तर भाजी मंडईत वारकऱ्यांसाठी निवाराची सोय करण्यात आली होती. हा उपक्रम ग्रामस्थांतून विशेष कौतुकास पात्र ठरला.


