महिलांना धाक दाखवून बांधून ठेवले ; १ वर्ष वयाच्या बालकास ओलीस ठेवून केली लूट
नाशिक मिरर:
सातपूरमधील लाहोटीनगरमध्ये आज सकाळी १०.४५ वाजता धाडसी दरोडा पडला. उद्योजक बाबूशेठ तथा बी. एस. नागरगोजे यांच्या ‘भगवानगड’ निवासस्थानी घुसलेल्या पाच दरोडेखोरांनी घरातील महिलांना धाक दाखवत तसेच सेलो टेपने जखडून ठेवत लूट केली. या घटनेचे वृत्त कळताच वरीष्ठ अधिकाऱ्यांसह सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयिताचा माग काढला जात आहे.
सविस्तर माहिती अशी दि. ७ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास बाबूशेठ नागरगोजे हे नित्यनेमाप्रमाणे कंपनीत गेले, ते गेल्यानंतर काही मिनिटातच संशयित बंगल्यात घुसले. आपल्याकडील धारदार शस्त्रांनी दहशत निर्माण करत संशयितांनी महिलांवर वचक निर्माण केला. महिलांना बांधून ठेवत चाव्या हस्तगत केल्या. १ वर्ष वय असलेल्या मुलाच्या मानेला चाकू लावून सोने व पैसे कुठे ठेवले आहेत यांची माहिती काढून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोकड घेऊन पोबारा केला. एकुण सुमारे ३० लाख रुपयांचा ऐवज व रोख रक्कम ची लूट केली असल्याचे समजते आहे. जाण्यापूर्वी संशयितांनी नाच करत मोठा ऐवज हाती पडल्याचा आनंद व्यक्त केला. संशयित निघून गेल्यानंतर महिलांनी मदतीसाठी पुकारा केला. यावेळी घरामध्ये नागरगोजे यांची पत्नी दोन सुना व १ वर्ष वयाचा नातू होतो. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त सोहेल शेख, वरीष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली. संशयितांचा माग काढण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या घटनेत नेमका किती ऐवज गेला याची माहिती घेतली जात आहे. भरसकाळी घडलेल्या या घटनेने सातपूर परिसरात खळबळ उडाली आहे.
पाळत ठेऊन लूट :
उद्योजक बाबूशेठ नागरगोजे हे कंपनीत गेल्यावर काही मिनिटातच संशयितांनी बंगल्यात प्रवेश करून सशस्त्र लूट केली. त्यामुळे पाळत ठेऊन ही लूट झाल्याचा संशय आहे. संशयितांनी पाळत ठेऊन घरातील कर्ती व्यक्ती कधी बाहेर जाते, त्यानंतर घरात कोण कोण असते याची माहिती घेऊन हा धाडसी दरोडा टाकल्याचा संशय असून त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
