समाजसेवी आमटे परिवारासह महाराष्ट्रला घटनेने धक्का बसला

चंद्रपूर : नाशिक मिरर वेबटीम वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी (४०) यांनी सोमवारी (३० नोव्हेंबर) सकाळी विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. या घटनेने आनंदवन परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.डॉ. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. दिवंगत बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून आमटे कुटुंबात वाद सुरू होता.त्यामुळे त्या मानसिक दृष्टीने अस्वस्थ होत्या. या वादावर सामंजस्याने तोडगा निघावा, अशी आमटे कुटुंबाची इच्छा होती. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू होते.परंतु, काही दिवसांपूर्वी शीतल आमटे यांनी समाजमाध्यमाद्वारे आमटे कुटुंबातील सदस्यांबाबत बदनामीकारक चित्रफित प्रसारित केल्यानंतर हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर काही वेळातच ती चित्रफित समाजमाध्यमावरून हटवण्यात आली. त्यानंतर आमटे कुटुंबातील प्रमुख सदस्यांनी पत्रक काढून डॉ. शीतल आमटे यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. दरम्यान, हा गृहकलह सुरू असतानाच सोमवारी दुपारी त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले.डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती, असे उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. डॉ. शीतल यांनी इंजेक्शन घेतले तेव्हा त्या खोलीत एकटय़ाच होत्या. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. शीतल यांचा मृतदेह सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. येथे डॉ. संदीम करमाकर, डॉ. बंडू रामटेके व डॉ. संदीप ढोबळे या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने शवविच्छेदन केले. डॉ. शीतल यांच्या पश्चात पती गौतम करजगी व सहा वर्षांचा मुलगा आहे. डॉ.शीतल याचे आत्महत्या मागील कारण अद्याप अस्पष्ट असून,आत्महत्येनंतर डॉ. शीतल आमटे यांची खोली वरोरा पोलिसांनी कुलूपबंद केली आहे. नागपूर येथील न्याय सहायक प्रयोगशाळेचे पथक आनंदवनात दाखल झाले आहे. त्यांच्या उपस्थितीत डॉ. शीतल यांच्या खोलीची संपूर्ण तपासणी केली जाणार आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन व सखोल तपासानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती वरोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे यांनी दिली आहे.

Don`t copy text!