संकटकाळात माणुसकी संपत नाही – सलीम शेख,नगरसेवक

नाशिक मिरर : गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात दीड महिन्याच्या टाळेबंदीमुळे अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. दिव्यांग बंधूंच्या कुटुंबाला तर टाळेबंदीची सर्वात जास्त झळ बसत आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड युनिट महाराष्ट्र नाशिक तर्फे दि. ४ जून रोजी नाशिक मधील दृष्टिबाधित बांधवांच्या कुटुंबाच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी गरजू दिव्यांग आणि दृष्टीबधित विद्यार्थ्यांना धान्य आणि दैनंदिन किराणा वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. नाशिकचे मनपाचे नगरसेवक सलीम शेख यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नॅबचे अध्यक्ष श्री रामेश्वर कलंत्री, मानद महासचिव श्री गोपी मयूर, सदस्य श्री पुंडलिक पिंपळके, संचालक विनोद जाधव, रत्नाकर गायकवाड, वाल्मिक पाटील, डे ब्लाइंड स्कुलच्या समन्वयक पूजा भालेराव आदी उपस्थित होते.

 

गोपी मयूर यांनी नॅबच्या कार्याची माहिती देऊन संकटाच्या काळात दिव्यांग बांधवांच्या सहकार्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे नमूद केले. सलीम शेख यांनी कठीण काळात खचून ना जाता मिळणाऱ्या चार घासातील एक घास गरजवंतांना वाटला तर पदरी पुण्य पडेल आणि संकटाला तोंड द्यायला नवी शक्ती मिळते असे प्रतिपादन केले.आणि नॅब करत असलेल्या कार्याचे कौतुक केले.

 

दिव्यांग सदस्य पुंडलिक पिंपळके यांनी कोरोनाने कठीण काळात खूप शिकवण दिली. कित्येक माणसं हिरावून नेली पण तो माणुसकी हिरावू शकला नाही. नॅब परिवार आम्हा सर्वांची शक्ती आणि प्रेरणा आहे या शब्दात मनोगत व्यक्त केले.

 

टाळेबंदीच्या काळात दृष्टीबधितांना आणि दिव्यांगजनांना मदत कार्याबरोबर या सर्व दिव्यांगजनांचे लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी नॅब युनिट महाराष्ट्र प्रयत्न करीत आहे. याबाबत कोणत्याही दिव्यांग बांधवांना कोणतीही मदत हवी असल्यास त्यांनी नॅब युनिट महाराष्ट्र शी 8805325000/7620842470 या क्रमांकावर संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले आहे. या कठीण काळात दिव्यांग बांधवांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सर्वांनी नॅबला देणगी स्वरूपात आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन नॅब महाराष्ट्र युनिटचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री आणि मानद महासचिव गोपी मयूर यांनी केले आहे.

Don`t copy text!