नाशिक मिरर :
युवराज छत्रपती संभाजी राजेंना साथ देत येता नसेल तर विरोध ही करू नका. असे भावनिक आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी विरोधकांना केले आहे.युवराज छत्रपती संभाजीराजे मागील काही वर्षां पासून मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे. राजकीय नेत्यांचे व पक्षीय कार्यालयाचे उंबरठे न झिजवता राजेंनी खेडोपाडी जावून सामान्य व गरीब मराठ्यांचे प्रश्न जाणून घेतले. व त्यानंतर तालुक्यातील व जिल्ह्यातील मराठा समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधली.
मराठा आरक्षणासाठी पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या आंदोलनांना छेद देत राजेंनी मराठा आरक्षण व इतर प्रश्नांसाठी आंदोलनाचे नवे पर्व सुरू केले. रयतेच्या केसालाही धक्का लागू नये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार व रयतेच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श समोर ठेवून राजेंनी सर्वप्रथम मराठा आरक्षणाच्या लढाईत आता सामान्य मराठ्याला उतरवायचे नाही अशी भूमिका घेतली आणि आंदोलनजीवी व मराठा आरक्षणाचा राजकीय फायदा घेणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. राजेंची सामान्य मराठ्यांच्या मनात असलेली विश्वासाहर्ता काही लोकांच्या डोळ्यात खुपायला लागली आणि त्यांनी छुप्या मार्गाने राजेंवर टीका सुरू केली पण राजे डगमगले नाही ,समाजाच्या मागण्या कश्या पूर्ण होतील यासाठी असंख्य लोकांच्या भेटी घेतल्या. आरक्षणाचा,न्यायालयीन बाबींचा सर्वकश अभ्यास केला. जेवढे मुद्देसूद मांडणी राजे करतात त्याच्या 1 % सुद्धा कोणताही राजकीय नेता आजच्या घडीला करू शकत नाही.कलम 342-अ , 338-ब बद्दल जर विचाराल तर बोलके पोपट डोकं खाजवत बसतील पण आरक्षणाचा नक्की मार्ग कोणता याचा अभ्यास राजेंनी करून तशीच मागणी सर्व स्थरावर केली. आता आरक्षणाचा लढा मोठा होत असल्याचे लक्षात आल्यावर मग तोपर्यंत समाजातील गरीब मराठा वर्ग सक्षम कसा होईल. ह्याचा अभ्यास करून पाच मागण्या सरकार समोर ठेवल्या.
आज जिथे सरकारी नोकऱ्या नगण्य झाल्या असताना मराठा तरुणांमध्ये कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देणारी “सारथी” ही संस्था सक्षम करण्याची गरज राजेंनी हेरली व त्याचा अभ्यास करून पाठपुरावा केला. मराठा तरुणांना उद्योगांसाठी अर्थ पुरवठा करणारे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला योग्य तो निधी मिळण्याची मागणी राजेंनी ठेवली त्याच सोबत सप्टेंबर २०२० च्या आधीच्या प्रलंबित नियुक्त्या व फी प्रतिपूर्ती सारखे मुद्दे, ओबीसीच्या धरतीवरती मराठा समाजाला लाभ मिळण्याबाबतची मागणी राजेंनी सरकार कडे केली. या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला योग्य तो कालावधी दिला व दरम्यानच्या काळात घरात न बसता महाराष्ट्रातील विविध भागांचे दौरे मात्र चालू ठेवले. अनेकांची इच्छा होती की राजेंनी आक्रमक भूमिका घ्यावी परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारची आक्रमक भूमिका प्राणघातक ठरली असती व त्यामुळेच एकीकडे स्वतःचा पक्ष आंदोलनाची भूमिका घेत असताना त्याच्या विरोधात जाण्याचे धाडस राजेंनी दाखवले व ते फक्त सामान्य मराठ्यांच्या भल्यासाठी.
मला आंदोलन पेटवायला दोन मिनिट सुद्धा लागणार नाहीत हे राजेंच वाक्य आहेत कारण राजेंच्या शब्दाला आज पूर्ण महाराष्ट्रात मान आहे. ज्या घराण्यातून राजे आलेले आहेत त्याचा इतिहास फार मोठा आहे.
त्यामुळे चुकीच्या व तात्पुरत्या फायद्यासाठी सामान्य जनतेचे प्राण धोक्यात टाकणं राजेंना बिलकुल मान्य नव्हते आणि नाही. त्यामुळेच सामान्य जनतेने रस्त्यावर न उतरता लोकप्रतिनिधींनी आरक्षणाबाबत व मराठा समाजाच्या प्रश्नाबाबत सर्वांसमोर भूमिका मांडण्याची अपेक्षा व्यक्त करत अशाप्रकारच्या आंदोलनाची हाक दिली. राजेंच्या विनंतीला मान देऊन कोल्हापूर व नाशिक या दोन्ही ठिकाणी सर्वच्या सर्व लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. हे सर्व करत असताना आंदोलनापासून सामान्य मराठ्यांना दूर ठेवले हे काही लोकांना बघवत नाही आहे. स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सामान्य लोकांना रस्त्यावरती आणण्याची अनेकांची प्रबळ इच्छा आहे परंतु स्वतःचे राजकीय भवितव्य धोक्यात घालून राजेंनी मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही भूमिकेचा विरोध केला आणि त्याला कुठेतरी फळ आले. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तात्काळ बैठक लावून राजेंच्या पाचही मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवली व त्याबाबत पंधरा ते वीस दिवसांची मुदत मागून घेतली. या सर्वच्या सर्व मागण्यांबाबत सरकार त्यांच्या स्तरावरती काम करेलच परंतु एवढे होत असताना सुद्धा आजही राजे त्यांच्या घरी बसलेले नाहीत. आजही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत . राजे आजही सामान्य मराठ्यांसोबत भेटीगाठी करत आहेत आणि हे अखंड चालू राहील कारण आमचा राजा हा रयतेचा राजा आहे तुम्ही त्याला कितीही बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी सामान्य मराठ्यांच्या हृदयामध्ये संभाजीराजे वसलेले आहेत आणि छत्रपती घराण्याचा वारसा चालवण्याची जबाबदारी छत्रपती संभाजीराजे हे अतिशय उत्तम पणे पार पाडत आहेत याचा प्रत्येक मराठ्याला अभिमान आहे. राजकीय पोळी भाजनारे आणी समाजासाठी निस्वार्थ काम करणाऱ्यातला फरक सामान्य लोकांना कळू लागला आहे. त्यामुळे बाजारू राजकीय व्यक्तींनी राजेंवर किती टीका केली तरी मराठा समाजासाठी जे कार्य राजेंनी हाती घेतली आहे त्याला आई भवानी नक्कीच यश देईल आणि त्यासाठी आपण सर्वांनी राजेंना साथ देणे गरजेचे आहे.
