मुंबई, दि. 24 : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात यावी. याचबरोबर तेथील शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्याचे प्रस्ताव करून त्यांना नियमाप्रमाणे जास्तीत जास्त सहकार्य करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
नंदुरबार जिल्ह्यातील जलसंधारण कामांबाबत मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस माजी आमदार नरेंद्र पाडवी, जलसंधारणचे अवर सचिव अ.र.जगताप, मुख्य वन संरक्षक श्री गोवेकर, धुळ्याचे वनसंरक्षक डी. डब्लु. पगार, नंदुरबारचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी आर.ए.कुलकर्णी व अन्य अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, शेतक-यांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने कामांना प्राधान्य देण्यात यावे. शेताच्या बांधावर व शेतक-यांच्या पडीत शेत जमिनीवर वृक्षलागवड तातडीने पूर्ण करण्यात यावे. या कामात येणा-या समस्या सोडविण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. मुख्यमंत्री जलसंवर्धन दुरूस्ती कार्यक्रम अंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील सात जलसंधारण योजनांची दुरूस्ती कामे प्रस्तावीत असून, या प्रशासकीय मान्यतेच्या कामांना गती द्यावी.
तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत येणारी कामे पूर्ण करावी. स्थानिक लोकांना या योजनेअंतर्गत कामे द्यावीत, असे निर्देशही राज्यमंत्री श्री.भरणे यांनी दिले.
०००
