नाशिक दिनांक 02 डिसेंबर 2021 (जिमाका वृत्तसेवा): निवडणुकांमुळे लोकशाहीचा ढाचा अबाधित राहतो, यासाठी समाजातील सर्जनशील घटक विविध पातळ्यांवर काम करत असतात. लेखक हा सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. लेखक आणि त्याची लेखणी व त्यांची हीच भूमिका केंद्रस्थानी ठेवून, भारत निवडणूक आयोगाच्या अधिनस्थ कार्यरत असलेल्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथमच ‘लेखक, भाषा आणि लोकशाही’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हा निवडणूक अधिकारी स्वाती थविल, मतदार नोंदणी अधिकारी भिमराज दराडे, नितीन गावंडे, तेजस चव्हाण, तहसिलदार अनिल दौंडे, प्रशांत पाटील, श्वेता पाटोळे, स्विप सल्लागार डॉ. दिपक पवार, साधना गोरे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, हा परिसंवाद ४ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.३० ते ७.३० वाजेपर्यंत पॉलिटेक्निक बिल्डींग येथील उपमंडप याठीकाणी आयोजित केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे होणारा परिसंवाद Chief Electoral Officer Maharashtra या फेसबुक पानावरून आणि https://ceo.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरूनही ऑनलाईन स्वरूपात पाहता येणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून मतदाराच्या जनजागृती संबंधी प्रकाशने आणि शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खेळांचे दालनही असणार आहे. भारत निवडणूक आयोगाने मतदार जागृतीसंबंधी निवडणूक साक्षरता मंडळ, चुनाव पाठशाळा, मतदार जागृती मंच ही व्यासपीठे तयार केली आहेत. यासंबंधी व्यासपीठे, शाळा- महाविद्यालये, गावा-परिसरांमध्ये, कार्यालयामध्ये स्थापन करण्यासंबंधीची मार्गदर्शक पुस्तिकाही या दालनात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने या दालनाला भेट देऊन लोकशाही संबंधीचे ल्युडो, सापशिडी यांसारखे खेळ तसेच व्यासपीठे समजून घ्यावीत, असेही मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी सांगितले.
या परिसंवादात ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल, मराठी भाषेच्या चळवळीतले प्रा. कौतिकराव ढाले-पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, पत्रकार आणि संपादक इब्राहीम अफगाण व दीप्ती राऊत, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. या परिसंवादाचे सूत्रसंचालन मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार करणार असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
000
