नाशिक मिरर : 

वर्षभरातील सकारात्मक आणि रचनात्मक उपक्रमशील पोलिसिंगची दखल घेऊन जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख सचिन पाटील  यांना छावा मराठा संघटना व छावा क्रांतीवीर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने,  मराठा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष विलास पांगारकर, छावा क्रांतीवीर सेना संस्थापक करण गायकर, मनपा गटनेते विलास शिंदे, विशाल पांगारकर, अ‍ॅड. मयुर पांगारकर आदींच्या उपस्थितीत हा सन्मान त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

सप्टेंबर 2020 मध्ये सचिन पाटील यांनी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यापासून डिसेंबर 2021 या जवळपास सव्वा वर्षाच्या कालखंडात जिल्ह्यात पोलिस दलाने केलेल्या कामगिरीचा या पुरस्कारासाठी प्रामुख्याने विचार करण्यात आला. पदभार घेतला त्या क्षणापासून पुरस्कारासाठी त्यांच्या नावाचा विचार होईपर्यंत जिल्ह्यात असलेली महामारी, त्या अनुषंगाने अंमलात असलेले निर्बंध आणि सामाजिक राजकीय परिस्थितीचे अवडंबर न करता प्रतिकूल परिस्थितूनही मार्ग काढून पोलिस  दलाला कुटुंब प्रमुख म्हणून  सचिन पाटील यांनी दिलेली उभारी जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राखून आणि महामारीला सीमेवर रोखण्यात पोलिस दलाला आलेले यश निर्भेळ कर्तृत्व सिद्ध करून गेले.त्याचीच पावती म्हणजे हा पुरस्कार आहे.

 

छत्रपतींच्या महाराष्ट्रात “मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा” या धारणेवर काम करण्याची मानसिकता व्यवहाराच्या बोलीने झाकोळू लागल्याने विशाल दृष्टिकोनाचा अभाव कर्तृत्वाला संकुचित करीत असल्याचे चित्र एका बाजूला भवताल व्यापित असतांना सचिन पाटील यांच्यासारखे अधिकारीही प्रशासकीय सेवेत आहेत, म्हणून मराठा रत्न हा पुरस्कार त्यांना प्रदान झाल्याने पुरस्काराचाच खऱ्या अर्थाने गौरव झाला, अशी भावना दातृत्व संस्थांनी  यावेळी व्यक्त केली.

      सागर शांत असतांना उघड्या रेतीवर वेगवेगळ्या आकाराचे शिल्प  उभारण्यात मिळालेला आनंद भरतीच्या लाटेत केव्हा वाहून जाईल याची खबर हौशी शिल्पकाराला नसते. मात्र हाडाचा, कसलेला,जातिवंत शिल्पकार लाटेची नजर चुकवून जेंव्हा शिल्प उभारतो तेंव्हा महाभरतीची लाटही त्या शिल्पाला चाटण्याचे धाडस करीत नाही.सचिन पाटील नावाच्या या जातिवंत शिल्पकाराने पोलिस अधीक्षक म्हणून जिल्ह्यात उभे केलेले कामही या रेतीवर साकारलेल्या शिल्पाइतकेच चिरस्मरणीय आहे. म्हणून त्यांना हा पुरस्कार आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीने देत आहोत.
– करण गायकर संस्थापक अध्यक्ष ,छावा क्रांतिवीर सेना

“रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन’, असे संत शिरोमणी  तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. संत शिरोमणींना अभिप्रेत असलेले युद्ध  कुणालाही कुठेही, कधीही  लढावं लागू शकतं,तो युद्धाचा प्रसंग कुणी आपल्याला आधी सांगत नाही.आपल्या आतील आवाज त्याचे संकेत देतो.त्या संकेताची भाषा समजून घेत संवाद साधता आला तर कुठलेही युद्ध लढून जिंकता येते.”
-सचिन पाटील, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण

 

 

बातम्या

Don`t copy text!