सलग २५ तास काव्य वाचनाचा विश्वविक्रमास सुरुवात
नाशिक मिरर वृत्तसेवा :
ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळच्या वतीने रौम्य महोत्सव निमित्ताने दि.१८ जानेवारी रोजी सकाळी सदर उपक्रमाचे उद्घाटन काव्य गुढी व काव्यदिंडीच्या माध्यमातून करण्यात आले .
काव्यदिंडी ने कै. कवी किशोर पाठक यांच्या निवासस्थानी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून ढोल पथक, ग्रंथ पालखी,लेझीम पथक ,कवितांचे फलक व घोषणांसह रामनगर,कलानगर परिसरातून डे केअर सेंटर शाळेपर्यंत दिंडी काढण्यात आली होती.
कार्यक्रमाचे उद्घाटन साहित्य शिरोमणी कुसुमाग्रज बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे, दिवंगत कवी आनंद जोर्वेकर यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी मंचावर वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या पश्चिम भारताच्या निरीक्षक अमी जैना मुकेश छेडा, वंडर बुक ऑफ रेकॉर्डचे परीक्षक अथर्व शुक्ल, कौशल घोडके, रेडिओ विश्वास चे विश्वास ठाकूर, ग्रंथ तुमच्या दारी चे सर्वेसर्वा विनायक रानडे, माननीय कवयित्री अलका कुलकर्णी, शाळेची माजी विद्यार्थिनी आणि अभिनेत्री कवयित्री मयुरी मंडलिक, कवी फाळके सर,नभांगी रानडे या समवेत संस्थेचे अध्यक्ष माननीय ल .जि. उगांवकर , सचिव माननीय श्री गोपाळ पाटील,सहसचिव माननीय डॉ. अंजली पाटील, संचालक छाया निखाडे, अनिल भंडारी, अजय जी ब्रम्हेचा, तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वासंती पाठक,प्राथमिक विभागाच्या माधुरी मरवट, आनंदवन बालमंदिराच्या पुनम सोनवणे, इंग्रजी माध्यमाच्या विद्या अहिरे व तनुजा कुलकर्णी उपस्थित होते. मंचावरील मान्यवरांचा संस्थेचे सचिव गोपाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सतत 24 वर्ष बालकवी स्पर्धेचा अविरत चालू ठेवलेला यज्ञ प्रतीकात्मक स्वरूपात मंचावरती ठेवण्यात आला होता. त्याचे फलित म्हणून काव्यहोत्रात सहभागी होणाऱ्या कवींच्या कवितांचा काव्यसंग्रह व संस्थेची स्मरणिका यांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मनोगतात बोलताना माननीय अमी छेडा यांनी रुपेरी काव्यहोत्रास शुभेच्छा दिल्या. मा.विश्वास ठाकूर यांनी ज्ञानवर्धिनीच्या या अभूतपूर्व उपक्रमाचे कौतुक केले. संस्थेच्या वतीने केले जाणारे अथक परिश्रम नक्कीच यशस्वी होतील अशा शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव गोपाळ पाटील म्हणाले की केवळ अभ्यास आणि प्रगती पत्र म्हणजेच माणूस घडवणे नव्हे तर, संवेदनशील समाजशील माणूस घडवायचा असेल तर सृजनशीलतेची कास धरायला हवी. मुलांच्या जाणिवा जागृत ठेवायला हव्यात .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन घुगे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानवर्धिनी परिवारातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आयोजन नियोजन समिती तसेच सर्व शिक्षक वृंद, यांनी परिश्रम घेतले.

