४० हजार कामगार बेरोजगार
नाशिक मिरर वेबटीम : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात आल्याने जिल्हयातील सुमारे साडेसहा हजार मंडप व्यावसायिक आणि त्यांना पूरक मंडप डेकोरेटर्सवरील ५० ते ६० हजार कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. मंडप व्यवसायाची शासनाने योग्य दखल घेऊन होरपळ कशी थांबेल हे बघितले पाहिजे, असे मत मंडप डेकोरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष केशव डिंगोरे यांनी केली आहे.मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने ऐन लग्नसराईच्या काळातील सर्व ऑर्डर्स रदद कराव्या लागल्या. कोरोना महामारीमुळे सर्व कामे रदद होउन घेतलेली अॅडव्हान्स रक्कमही परत देण्यात आली. अशा परिस्थितीत वेगवेगळे कर भरणे आणि कामगारांना पगार देणे अतिशय कठिण होउन बसले आहे. नाशिक जिल्हयात साडेसहा हजाराहून अधिक मंडप व्यावसायिक आहेत. तसेच या व्यावसायामध्ये मनुष्यबळाची मोठया प्रमाणात आवश्यकता भासत असल्यामुळे कामागर संख्याही मोठया प्रमाणात आहे. आजमितीस जिल्हयातील छोटया मोठया अशा सर्व प्रकारच्या मंडप डोकोरेटर्सकडील कामागर संख्या ही अंदाजे ५० ते ६० हजाराहून अधिक आहे. मार्च ते जून हा कालावधी विवाह सोहळे, समारंभांचा असतो आता हा सिझन तर हाताचा गेला त्यामुळे दिवाळीनंतर होणारया सोहळयांवरच या व्यावसायाची भिस्त अवलंबुन आहे. हा हंगाम जर हातचा निघून गेला तर वर्षभर उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न या व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.
