कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी २ आठवड्यात परवान्यासाठी अर्ज
पुणे-संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या कोरोनावरच्या लसीचं वितरण पहिल्यांदा भारतातच होणार असून कोरोना लसीचा आपत्कालीन वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या दोन आठवड्यात केंद्र सरकारकडे परवानगी मागण्यात येणार असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे येथील सिरम इन्स्टिट्युटला भेट देऊन कोविशिल्ड लशीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अदर पुनावाला यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर अनेक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे अदर पूनावाला यांनी सांगितले.सिरम इन्स्टीट्युटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव असून ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे. असे हि ते म्हणाले
सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली असून या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडून परवानगी घेण्यात येणार आहे. येत्या दोन आठवड्यात लायसन्सची मागणी करण्यात येणार असल्याचं पुनावाला यांनी सांगितलं.आमच्याकडे कोरोना लसीच्या वितरणाचा प्लॅनही तयार आहे.२०२१ जुलै पर्यंत ३० ते ४० कोटी लसींच्या डोसची निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात येणार आहे.मात्र कोरोना लसीच्या किंमतीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
